पुणे : शहरातील निम्मे अंत्यसंस्कार वैकुंठातच ! स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न | पुढारी

पुणे : शहरातील निम्मे अंत्यसंस्कार वैकुंठातच ! स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

हिरा सरवदे :

पुणे : शहर व समाविष्ट गावांमध्ये एकूण 150 स्मशान व दफनभूमी असतानाही केवळ एकट्या वैकुंठ स्मशानभूमीतच निम्म्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या स्मशानभूमीत उपनगरांमधीलही मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जातात. परिणामी, वैकुंठ स्मशानभूमीवर प्रचंड ताण येतो. शिवाय परिसरातील वायू प्रदूषण वाढत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला देऊन 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मूळ हद्दीसह नवीन समाविष्ट गावांमध्ये तब्बल 150 स्मशानभूमी व दफनभूमी आहेत. यामध्ये शेड, विद्युत, गॅस दाहिनींसोबतच मुस्लिम, ख्रिश्चन आणि लिंगायत समाजासाठी विविध ठिकाणच्या दफनभूमींचा समावेश आहे. नागरिकांना जवळच्या परिसरात अंत्यसंस्कारांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शहराच्या सर्वच भागात स्मशान व दफनभूमी उभारल्या आहेत.

महापालिका प्रशासनाकडील नोंदीनुसार 2021 मध्ये शहरात एकूण 22 हजार 372 अंत्यसंस्कार झाले. त्यातील 11 हजार 216 म्हणजे 50.13 टक्के मृतदेहांवर एकट्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीतील मनुष्यबळावर ताण येतो. शिवाय परिसरातील वायूप्रदुषण वाढते. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात ’निरी’ या शासकीय संस्थेकडून काही महिन्यांपूर्वी वैकुंठ स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर निरीने येथील अंत्यसंस्काराची संख्या आणि वायूप्रदूषण कमी करण्यासाठी काही मार्गदशक सूचना केल्या आहेत. तसेच रहिवाशांनीही निरीच्या सूचनांना पूरक अशीच मागणी केली आहे.

‘वैकुंठ’वर का येतो ताण ?

वैकुंठ स्मशानभूमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.
समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचे निधन झाल्यानंतर वैकुंठातच अंत्यसंस्कार केले जातात.
वैकुंठामध्ये अंतिम संस्कार करणारे गुरुजी व इतर सोयी-सुविधा विनाविलंब उपलब्ध होतात.
उपनगरांसह परगावाहून येणार्‍या पाहुण्यांसाठी सोयीचे ठिकाण.
पेठांमधून स्थलांतरित लोक वैकुंठलाच प्राधान्य देतात.

पालिका देणार प्रबोधनावर भर

स्मशानभूमीच्या संदर्भात महापालिकेने एक धोरण तयार केले आहे. वैकुंठातील अंत्यसंस्कारांची संख्या कमी करावी, सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे, रात्रीच्या वेळी स्मशानभूमी बंद ठेवावी, त्या-त्या भागातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करावेत, यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे, आदी उपाययोजनांचा धोरणात समावेश आहे. मात्र, या धोरणावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

शहरातील इतर स्मशानभूमीतील अडचणी
पालिकेचे कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात.
स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नसते.
गुरुजींची व्यवस्था नाही.

वैकुंठ स्मशानभूमीत 2021 मध्ये झालेले अंत्यसंस्कार ः

महिना – स्त्रि – पुरुष – बालक
1) जानेवारी – 320 – 385 – 31
2) फेब्रुवारी – 346 – 359 – 26
3) मार्च – 451 – 427 – 35
4) एप्रिल – 922 – 911 – 30
5) मे – 526 – 750 – 32
6) जून – 354 – 443 – 13
7) जुलै – 326 – 444 – 12
8) ऑगस्ट – 482 – 403 – 17
9) सप्टेंबर – 351 – 348 – 40
10) ऑक्टोबर – 363 – 420 – 28
11) नोव्हेंबर – 309 – 389 – 40
12) डिसेंबर – 372 – 465 – 46
————————————–
एकूण – 5122 – 5744 – 350
—————————————————–
शहरातील विविध स्मशानभूमी व दफनभूमींमध्ये 2018 ते 2021 या कालावधीत झालेल्या अंत्यसंस्काराची आकडेवारी ः

वर्ष – स्त्रि – पुरुष – बालक
2018 – 3763 – 4898 – 362
2019 – 5167 – 3631 – 394
2020 – 7550 – 10263 – 402
2021 – 9769 – 12067 – 536
एकूण – 26249 – 31159 – 1694

Back to top button