आंबेगावच्या उत्तर भागात बिबट्याचा वावर | पुढारी

आंबेगावच्या उत्तर भागात बिबट्याचा वावर

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : चांडोली खुर्द तसेच साकोरे गावामध्ये वारंवार बिबट्याने कुर्त्यांवर हल्ले केले असून त्यामध्ये बाबाजी थोरात, सुनील इंदोरे, आदिक इंदोरे आणि महेंद्र बांगर यांचे चार पाळीव कुत्रे फस्त केले आहेत. दोन दिवसांपूर्वी राजेंद्र इंदोरे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला; मात्र यातून कुत्रा वाचला. यावरून आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे सिद्ध होत आहे. त्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी बाबाजी इंदोरे यांनी तीन वेळा मंचर वनविभागाकडे पिंजरा लावण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. वनविभागाने याची दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. वारंवार बिबट्याच्या दर्शनामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकर्‍यांना शेताला पाणी भरता येत नाही. त्यामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे.

नांदूर येथील वायाळ मळा ओढ्यालगत सोमवारी (दि. 21) रात्री मेडिकल व्यावसायिक मच्छिंद्र चिखले यांच्या दुचाकीला बिबट्या आडवा गेला. त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. चांडोली खुर्द गावामध्ये पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थ व आंबेगाव तालुका किसान काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब इंदोरे, ग्रामसेवक नवनाथ निचित व ग्रामस्थांनी केली आहे.

 

Back to top button