पुणे : पूर्वसूचना न देता कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित | पुढारी

पुणे : पूर्वसूचना न देता कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अस्मानी संकटातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा महावितरणने सुल्तानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे केले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी कृषी पंपांच्या असलेल्या थकबाकीपोटी सरसकट वीजपुरवठा खंडित करणे किंवा डीपी बंद करण्याचा सपाटाच महावितरणने लावला आहे. परिणामी शेतातील पिके पाण्यावाचून जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. विविध राजकीय पक्षांसह याप्रकरणी आता शेतकरी संघटनादेखील आक्रमक झाल्या असून हा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी होत आहे.

शेतकरी संघटना महावितरणवर धडकली

राहू : कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण पुन्हा एकदा वीज बिलाच्या थकबाकीपोटी बेट परिसरातील विद्युत पंपाचा पुरवठा बंद करीत आहे. त्यामुळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण पिंपळगाव येथील कार्यालयास घेराव टाकला. तातडीने कृषी पंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन या वेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले. पिंपळगाव येथील महावितरण शाखेच्या दुय्यम अभियंता पप्पू पिसाळ यांनी शेतकरी संघटनेचे निवेदन स्वीकारत याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.

वीजपुरवठा कायदा 2003 चे कलम 56 (1) प्रमाणे कोणतीही लेखी सूचना न देता बेकायदेशीर पद्धतीने शेतकर्‍यांची वीज कनेक्शन बंद करत महावितरण शेतकर्‍यांची आर्थिक लूट करत आहे. तसेच कृषीपंपाची वीज कनेक्शन त्वरित सुरू करावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या वेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील नातू, कार्याध्यक्ष महेश थोरात, राजेंद्र शिंदे, राम गाडेकर, राजेंद्र दिवेकर, नितीन जावळे, विष्णूभाऊ जगताप, नितीन जगताप, मच्छिंद्र शिंदे, ब—म्हानंद मापारे, महेश शिंदे, अनिल फरगडे, हरी विश्वासे, दीपक कापरे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चुकीच्या पद्धतीने महावितरण शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन बंद करत असल्यामुळे शेतकर्‍यांची उभी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. महावितरणने यामध्ये सुधारणा न केल्यास यापुढील काळामध्ये उपोषण करणार आहे.
                                           – दीपक पवार, कार्यकर्ते, शेतकरी संघटना

शेतकर्‍यांनी कमी-अधिक प्रमाणात योग्य वेळी वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याची गरज आहे, तरच शेतकर्‍यांना सुरळीतपणे वीजपुरवठा करणे शक्य येईल.
                                            – पप्पू पिसाळ, दुय्यम अभियंता, महावितरण

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तातडीने पूर्ववत करा

शेतात पिके असताना विद्युत वितरण विभागाकडून वीज कनेक्शन बंद करत असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तातडीने पूर्ववत करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना गटाने महावितरणच्या अधिकार्‍यांकडे केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयात बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, शिरुर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, उप तालुका प्रमुख संतोष वर्पे, शिवाजी नवले, शरद नवले संपत कापरे, तेजस फलके , गणेश कोतवाल आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले होते. या पूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना पीक घेता आलेले नाही.

परिणामी कोणतेही उत्पन्न न मिळाल्याने वीजबिले देता आली नाहीत. मात्र, सध्या शेतात पिके उभी असताना कनेक्शन कट केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शिवसेनेचे निवेदन वरिष्ठ कार्यालयास पाठवून बोलणार आहे. शेतकर्‍यांनीही बिल भरून महावितरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.

शेतीपंपाची वीजजोड तोडणी बंद करा

शेतीपंपाची वीजजोड तोडू नका आणि शेती पिकवणार्‍यांवर अन्याय करू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. पक्षाच्या वतीने माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडी येथील कार्यकारी उपअभियंता यांच्या कार्यालयास या विषयाचे निवेदन देण्यात आले. या वेळी पक्षाच्या पदाधिकारी वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, तात्या ताकवणे, योगिनी दिवेकर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपकार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांना याप्रसंगी निवेदन देण्यात आले. या निवेदनात वीज बंद करणे, रोहित्र बंद करणे या प्रकाराने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आधीच प्रचंड झालेल्या पावसाने शेती पिकाचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाने शेतकर्‍यांना अडचणीत आणल्याने त्यातून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न असताना त्यांना हे नवीन संकट आहे. असणारी पिके वीजजोड नसल्याने पाण्यावाचून जळून जातील. नव्याने पेरणी केलेली पिकांची देखील पाणी नसल्याने अवस्था बिकट होऊन आर्थिक संकट येऊ शकते, याचा गांभीर्याने विचार केला जावा आणि वीजतोड तत्काळ बंद करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button