पुणे : दिलासा : दोन आठवड्यांत बाधित 25 टक्क्यांनी घटले | पुढारी

पुणे : दिलासा : दोन आठवड्यांत बाधित 25 टक्क्यांनी घटले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दैनंदिन अहवालानुसार 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दोन आठवड्यांच्या कालावधीत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 25 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील दोन आठवड्यांचा आढावा घेतला असता सप्ताहातील दैनंदिन कोविड रुग्णांमध्ये 1037 पासून 773 पर्यंत घट झाली आहे. याशिवाय, या आठवड्यांमध्ये राज्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार साप्ताहिक मृत्यू दर 0.39 टक्के आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील मृत्यूदर 1.81 टक्के इतका होता.

राज्यात दोन आठवड्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर 1.15 टक्क्यांवरून 0.89 टक्क्यांवर आला आहे. अकोला, पुणे, कोल्हापूर, जालना आणि सांगली या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट दोनपेक्षा अधिक आहे. राज्यातील एकूण कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे.रुग्णालयामध्ये भरती होणार्‍या तसेच आयसीयूमध्ये दाखल कराव्या लागणा-या रुग्णांमध्ये नियमितपणे घट होताना दिसते आहे. या आठवड्यात एकूण दैनंदिन रुग्णांच्या 1.55 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झालेले आहेत.

134 एक्सबीबी व्हेरियंट
आतापर्यंत राज्यात मुंबई (72), पुणे (46) ठाणे (8), नागपूर, भंडारा प्रत्येकी 2, अकोला, – अमरावती, रायगड, कोल्हापूर- प्रत्येकी 1 असे एकूण 134 एक्सबीबी व्हेरियंट सापडले आहेत. या भागात कोरोना प्रसाराचा वेग आणि रोगाची तीव—ता वाढलेली नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

Back to top button