अकरावीचे 32,947 प्रवेश झालेच नाहीत, प्रवेश प्रक्रिया संपल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर | पुढारी

अकरावीचे 32,947 प्रवेश झालेच नाहीत, प्रवेश प्रक्रिया संपल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी 12 ते 19 नोव्हेंबरदरम्यान अखेरची प्रवेश फेरी राबविण्यात आली. आता मात्र या फेरीला कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. अकरावीसाठी 79 हजार 43 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर प्रवेशाच्या 32 हजार 947 जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर आणि मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी सात फेर्‍या राबवूनही काही विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळाल्याने अकरावीला प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी 12 ते 19 नोव्हेंबरदरम्यान फेरी राबविण्यात आली.

या फेरीमध्ये प्रवेशापासून वंचित काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे फेरी सुरू करण्याचा उद्देश सफल झाला आहे. त्यामुळे यापुढे संबंधित फेरीला आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळेच फेरी सुरू करण्यात आली होती, असे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया संपली आहे. दरवर्षी 20 हजारांच्या आसपास जागा रिक्त राहतात. यंदा मात्र खूप जागा रिक्त राहिल्या आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये – 319
एकूण प्रवेशक्षमता – 1,11,990
एकूण नोंदणी – 1,08,031
कोटा प्रवेशक्षमता – 15,506
कोटांतर्गत प्रवेश – 10,233
कॅप प्रवेशक्षमता – 96,484
कॅपअंतर्गत अर्ज – 76,049
एकूण प्रवेश – 79,043
रिक्त जागा – 32,947

Back to top button