भिवडी येथे गॅसगळतीमुळे दोन घरे खाक; लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान | पुढारी

भिवडी येथे गॅसगळतीमुळे दोन घरे खाक; लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान

सासवड; पुढारी वृत्तसेवा : भिवडी (ता. पुरंदर) येथे एका घरात गॅस सिलिंडरला गळतीमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घरातील संसारोपयोगी साहित्यांसह लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी (दि. 13) रात्री दहाच्या सुमारास घडली असून, यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, मोकाशी वस्ती (भिवडी) येथे मारुती नथू खोमणे व रामदास नथू खोमणे यांचे घर आहे,

नारायणपूर येथे नातेवाइकांचे लग्न आटोपून घरी रात्री 9:30 ला आले होते. नंतर दहाच्या सुमारास गॅसवर दूध तापवत असताना अचानक गॅसला गळती सुरू झाली. त्यानंतर सिलिंडरने पेट घेतल्याने कुटुंबातील सर्व घराबाहेर आले. काही क्षणात गॅसचा मोठ्या प्रमाणावर भडका झाला व घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

ओल्या चादरीच्या साहाय्याने सिलिंडरच्या टाकीतून निघणारी आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत घरातील रोख पन्नास हजार रुपये, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, दागदागिने याची राखरांगोळी झाली. येथील दोन कुटुंबे बेघर झाली व अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. या दोन खोमणे कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी, हीच अपेक्षा येथील नागरिकांनी केली. या घटनेची माहिती मिळताच माजी सभापती विठ्ठल मोकाशी, माजी उपसरपंच बापू मोकाशी, बाळासाहेब भिंताडे, दिलीप वांढेकर, पोलिस पाटील अक्षय शिंदे, सुरेश चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट दिली.

 

 

Back to top button