संगमवाडी बीआरटीत होणार नूतनीकरण; बसथांबे दुरुस्तीचे काम सुरू | पुढारी

संगमवाडी बीआरटीत होणार नूतनीकरण; बसथांबे दुरुस्तीचे काम सुरू

हिरा सरवदे

पुणे : संगमवाडी ते येरवडा येथील बिंदू माधव ठाकरे (सादलबाबा चौक) चौकापर्यंतच्या बीआरटी मार्गाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सुरुवातीस हा मार्ग थर्मोप्लास्टिक पेंटच्या माध्यमातून आखला जाणार आहे. बसची वारंवारिता वाढल्यानंतर हा मार्ग लोखंडी जाळीने संरक्षित केला जाणार आहे. दरम्यान, या मार्गावरील बसथांब्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतूक गतिमान व्हावी, यासाठी महापालिकेने सन 2006 मध्ये शहराच्या काही भागांत शेकडो कोटी रुपये खर्च करून बीआरटी मार्ग विकसित केले आहेत. यातील एक मार्ग असलेल्या संगमवाडी ते बिंदू माधव ठाकरे चौक यादरम्यान एक बीआरटी मार्ग महापालिकेने विकसित केला होता. या मार्गाचा वापर आळंदी, विमानतळाकडे जाणार्‍या पीएमपीएमएल बसकडून केला जात होता.

हा मार्ग जेव्हा तयार करण्यात आला, तेव्हा हा रस्ता डांबरी होता. हा रस्ता सुस्थितीत असतानाही आणि रस्त्याचा योग्यप्रकारे वापर सुरू असतानाच महापालिकेने येथील बीआरटी मार्ग उखडून 20 कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे काँक्रिटीकरण केले. कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झालेला असतानाही काँक्रिटीकरणावर उधळपट्टी केली जात असल्याने प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, या टीकेकडे दुर्लक्ष करून काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.

काँक्रिटीकरणासाठी बीआरटीचे लोखंडी रेलिंग काढले. मात्र, अंदाजे 70 लाख रुपये खर्च करून उभारलेले बसथांबे जागेवरच ठेवले. त्यामुळे बसथांब्यांची उंची कमी झाली. त्यामुळे बसच्या दरवाजाची उंची आणि बसथांब्यांची उंची यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली होती. रस्त्यावर बीआरटीचा पत्ता नसताना बसथांबे मात्र रस्त्याच्या मध्यभागी तसेच उभे होते. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा बीआरटी होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मात्र, पीएमपीएमएलच्या अभिप्रायानुसार या रस्त्यावर पुन्हा बीआरटी मार्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी उंची कमी झालेल्या बसथांब्याची उंची वाढविण्यासह दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेच्या पथ विभागाने हाती घेतले आहे. सुरुवातीस थर्मोप्लास्टिक पेंटच्या माध्यमातून बीआरटी मार्गाची आखणी केली जाणार आहे. त्यानंतर बसची वारंवारिता वाढल्यानंतर ’पीएमपीएमएल’च्या सल्ल्यानुसार ’बीआरटी’ला लोखंडी जाळीने (रेलिंग) संरक्षित केले जाणार असल्याचे पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

संगमवाडी ते येरवडा यादरम्यानच्या बीआरटी मार्गासंदर्भात यापूर्वीच पीएमपीएमएलचा अभिप्राय घेण्यात आला आहे. त्यांनी बीआरटी आवश्यक आहे, असा अभिप्राय दिल्याने त्यांच्या सल्ल्यानुसार बीआरटीचे काम सुरू आहे. बीआरटीसंदर्भात वाहतूक पोलिसांनी पत्र दिल्यानंतर पुन्हा पीएमपीएमएल अभिप्राय घेण्यात आला. आताही पीएमपीएमएलने सकारात्मक अभिप्राय दिला आहे. त्यामुळे पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलिस यांच्याशी विचारविनिमय करूनच काम केले जाणार आहे.
                                                                          – डॉ. कुणाल खेमणार,
                                                                              अतिरिक्त आयुक्त

Back to top button