आजोबांचा प्रताप! डेटिंगसाठी मोजले चक्क सतरा लाख रूपये; पण ती आलीच नाही! | पुढारी

आजोबांचा प्रताप! डेटिंगसाठी मोजले चक्क सतरा लाख रूपये; पण ती आलीच नाही!

पुणे, पुढारी वृत्तसेवा : बँकेतील गलेलठ्ठ पगार असलेल्या पदावरून निवृत्त झालेल्या ऐंशी वर्षांच्या आजोबांनी डेटिंग साईटवरील ललनेच्या जाळ्यात अडकून एक नव्हे… दोन नव्हे… तर तब्बल 17 लाख 10 हजार रुपये गमावले. हा काही शहरातील पहिलाच प्रकार आहे, असे नाही. अशाप्रकारे अनेक तरुण, ज्येष्ठ नागरिक फसले आहेत.

याप्रकरणी 79 वर्षांच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून, श्रेया नावाच्या महिलेवर वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आजोबा हे वारजे-माळवाडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते बँकेतून अधिकारीपदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी एका खासगी कंपनीतदेखील नोकरी केली आहे. ते सध्या घरीच असतात.

त्यांनी त्यांच्या आयुष्याची कमाई बँकेत जमा करून ठेवली होती. डिसेंबर 2021 मध्ये त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेचा फोन आला. तिने तिचे नाव श्रेया असे सांगितले. तसेच तिने फिर्यादी आजोबांना तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का? अशी थेट विचारणा केली. त्यावर आजोबांच्या होकारानंतर त्यांनीच तिला मुलींचे फोटो पाठविण्यास सांगितले. त्यानंतर आजोबांच्या मोबाईलवर तरुणींचे फोटो मिळाले. ते पाहून आजोबा यांनी डेटिंगसाठी कोणतीही मुलगी चालेल, असे सांगितले. त्यानंतर फोनवरील महिलेने मागणी केल्याप्रमाणे आजोबांनी तिच्या गुगल पे अकाउंटवर 3 हजार रुपये पाठवले.

त्यानंतर आजोबांनी मुलगी पाठविण्यास सांगितले असता, तिने आणखी पैसे लागतील, असे सांगून तिच्याकडील बँक अकाउंट नंबर पाठविला. त्यानंतर आजोबांनी बँकेत जाऊन तिच्या खात्यात पैसे भरले. याच दरम्यान तिने अधूनमधून आणखी पैशांची मागणी केल्यानंतर तिला वेळोवेळी पैसे पाठवले. पैसे पाठविल्यानंतर तिच्याकडे मुलीची मागणी केल्यावर ती तरुणी आणखी पैसे लागतील, अशी बतावणी करीत होती. फोनवरील ती तरुणी आज मुलगी भेटेल, उद्या मुलगी भेटेल, असे कारण सांगत होती. त्यानुसार फिर्यादी पैसे भरत गेले. काही दिवसांनंतर श्रेयाने पुन्हा त्यांना फोन करून साडेसहा लाखांची मागणी केली. त्यावर त्यांनी आधी मुलगी पाठव, मग पैसे देतो, असे बोलल्यानंतर तिने फोन करणे बंद केले. तिला वारंवार फोन लावल्यानंतर तिचा फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.

तोपर्यंत आजोबांनी त्यांच्या खात्यातून तब्बल 17 लाख 10 हजार पाठवले होते. हा प्रकार त्यांच्या मुलाला समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी आता या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वारजे-माळवाडी पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक डी. जी. बागवे करीत आहेत.

हे लक्षात ठेवाच….
आंबटशौकीन लोकांची संख्या डेटिंग साईटवर जास्त आहे. त्यामध्ये प्रायव्हसी असल्यामुळे अनेक जण आकर्षित होतात. सुरुवातीला खूप कमी पैशात मेंबरशीप दिली जाते. त्यानंतर अलगद सायबर चोरटे जाळे टाकतात. सायबर चोरटे महिलांच्या नावे बनावट खाते तयार करतात. हनिट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे संभाषणासाठी महिलांची नेमणूक करतात. एकदा का तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संभाषण करण्यास सुरुवात केली, की तुमचे रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल केले जाते. त्यातूनच पुढे तुमचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात.

…अशी घ्या काळजी
अनोळखी व्यक्तीची योग्य पडताळणी केल्याशिवाय फ—ेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी आपला सक्रिय मोबाईल क्रमांक शेअर करू नका.
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नका.
अनोळखी व्यक्तीकडून आधी व्हॉइस कॉल आला असेल आणि नंतर व्हिडिओ कॉलची रिक्वेस्ट येत असेल, तर ती स्वीकारू नका.
अशा प्रकारे कोणी ब्लॅकमेलिंग करीत असेल, तर सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

डेटिंगसाईटवरून मुली पुरविण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रेया नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा प्रलोभनाला बळी न पडता खबरदारी घेतली, तर होणारी आर्थिक फसवणूक टाळता येईल.

                            – डी. जी. बागवे, गुन्हे निरीक्षक, वारजे-माळवाडी पोलिस ठाणे.

Back to top button