पुणे : ग्रामीण भागात एसटीच्या फेर्‍या वाढणार; पीएमपी ग्रामीण मार्गावरील सेवा बंद करणार | पुढारी

पुणे : ग्रामीण भागात एसटीच्या फेर्‍या वाढणार; पीएमपी ग्रामीण मार्गावरील सेवा बंद करणार

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपीने ग्रामीण भागात सुरू असलेले 40 मार्ग बंद करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी प्रशासन पहिल्या टप्प्यात 18 ग्रामीण भागातील मार्गांवर एसटीच्या गाड्यांच्या फेर्‍या तत्काळ वाढवणार आहे. संपकाळात एसटीची सेवा बंद होती, याचा फायदा घेत पीएमपी प्रशासनाने सर्रासपणे ग्रामीण भागात एसटीची परवानगी न घेताच आपली सेवा सुरू केली.

संप संपला, एसटीची सेवा पूर्ववत झाली, परंतु पीएमपीने काही ग्रामीण भागातील मार्ग बंद केले नाहीत. आता पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी पुणेकरांना कमी पडत असलेल्या गाड्यांची संख्या लक्षात घेता, ग्रामीण भागातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार पीएमपी ग्रामीण भागातील 40 मार्ग आता बंद करणार आहे. मात्र, ग्रामीण भागात 104 मार्गांवर सुरू असलेली ही सेवा लगेचच बंद करता येणे शक्य नसल्याने एसटी आणि पीएमपी प्रशासन एकत्र नियोजन करून पहिल्या टप्प्यात 18 मार्ग बंद करणार आहे. त्यानुसार एसटी 18 मार्गांवर आपल्या गाड्या आणि फेर्‍या देखील वाढविणार आहे.

एसटीच्या पत्रव्यवहारांना अखेर यश
ग्रामीण भागात सुरू केलेल्या मार्गावरून एसटी आणि पीएमपीमध्ये अनेक दिवसांपासून ’तू तू मै मै’ सुरू होती. पीएमपीने ग्रामीण मार्ग तत्काळ बंद करावेत. एसटीची परवानगी न घेताच हे मार्ग सुरू केले आहेत. अशी पत्रे पीएमपी प्रशासनाला नेहमीच पाठवण्यात येत होती. अखेर पीएमपीचे अध्यक्ष बदलल्यानंतर एसटीच्या मागणीला यश आल. पीएमपीचे पहिले पत्र एसटीला गेले असून, ग्रामीण मार्गावरील सेवा बंद करत आहे, या मार्गांवर एसटीच्या गाड्या वाढवाव्यात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नियम काय सांगतो…
पीएमपीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहरापुरतीच मर्यादित आहे. तर, एसटीची सेवा राज्यभर देता येते. महापालिका हद्दीबाहेर सेवा सुरू करायची असल्यास पीएमपीला एसटीची परवानगी घेणे अनिवार्य असते. परंतु, पीएमपीने ग्रामीण मार्ग सुरू करताना कोणतीही परवानगी घेतली नव्हती. यामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत आहे.

आम्ही पहिल्या टप्प्यात 18 मार्गांवर आमची सेवा वाढविणार आहोत. यात गाड्या आणि त्यांच्या फेर्‍यादेखील वाढणार आहेत. पीएमपीने या मार्गावरील आपली सेवा बंद करावी. प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीच्या ज्यादा गाड्या धावतील.

                                                          ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय
                                                             वाहतूक अधिकारी, पुणे

शहराबाहेर सुरू असलेले पीएमपीचे एकूण मार्ग 104
पूर्वीचे ग्रामीण हद्दीतील मार्ग 57
नव्याने सुरू करण्यात आलेले मार्ग 47
शहरात धावत असलेल्या गाड्या संख्या 1290
एकूण बसगाड्या 2 हजार 142

एसटी वाढणार; पीएमपीने हे मार्ग बंद करावेत
सासवड – यवत
हडपसर – यवत
वाघोली-राहू
वाघोली -रांजणगाव
चाकण-शिक्रापूर
सासवड-जेजुरी
स्वारगेट-निरा
भोसरी-जुन्नर
भोसरी-मंचर-घोडेगाव
सासवड-वीर
स्वारगेट-पानशेत
स्वारगेट-विंझर
स्वारगेट – खारवडे
स्वारगेट – बेलवडे
सासवड – उरुळी कांचन
स्वारगेट- मोरगाव
कापूरव्होळ-सासवड
स्वारगेट – जेजुरी

Back to top button