भिगवणची सकाळ आणि मावळती खासगी सावकारीनेच! | पुढारी

भिगवणची सकाळ आणि मावळती खासगी सावकारीनेच!

भरत मल्लाव

भिगवण : आर्थिक उलाढालीचे केंद्र बनू पाहणार्‍या भिगवणमध्ये खासगी सावकार भूछत्रीप्रमाणे जागोजागी उगवले आहेत. या सावकारांचे लागेबांधे राजकीय नेते, अधिकारी व गुन्हेगारी विश्वाशी जोडले गेले असल्याने सावकारकीने अक्षरशः राक्षशी रूप धारण केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे भिगवणची सकाळ खासगी सावकारीच्या व्यवहारातून सुरू होते आणि मावळतेही खासगी सावकारीच्या माध्यमातूनच.

विशेष म्हणजे ज्या रक्तपिपासू खासगी सावकारांनी उच्छाद मांडला आहे तेच सावकार कोणाच्याच रडारवर येत नाहीत. त्यामुळे मूळ सावकारांच्या बुडाला जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत सावकारकीचे धुपत धोंगडे समाजात धुसमत राहणार आहे. बारामती, इंदापूर, दौंडनंतर सर्वाधिक सावकारांचा धुमाकूळ भिगवण भागात आहे. मदनवाडी चौक व भिगवण ही त्यांची आश्रयस्थाने आहेत. त्यामुळे बाजारपेठेत जेवढी आर्थिक उलाढाल व्यवसायातून होत नसेल तेवढी उलाढाल सावकारकी व भिसीच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र आहे.

बहुतांश नागरिकांना बँका, पतसंस्था जवळ करीत नसल्याने व त्वरित कर्ज मिळण्याचे प्रभावी साधन म्हणून सावकारांचे उंबरे झिजवण्याची नामुष्की ओढवते आणि नेमकी ही बाब लक्षात घेऊन बेलगाम सावकार अव्वाच्या सव्वा व्याजाने पतपुरवठा करतात. त्यांच्या व्याजाचा दर महाराष्ट्र सावकारकी प्रतिबंध कायद्याला दावणीला बांधून टाकलेला असतो.

दरसाल दर शेकडा पद्धतीला येथे थारा नसतो. महिन्याला शेकडा 10 टक्क्याहून अधिक व त्याहून जुलमी पद्धत म्हणजे प्रतिदिन हजार रुपयाला दहा रुपये रोज म्हणजे एखाद्याने एक लाख घेतले तर दहा हजार रुपये महिना. साहजिकच आधीच अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला व्याजाचा हा दर घरादारावर तुळशीपत्र ठेवणारा ठरतो. वरून कर्जदार हा घाट्यात गेला तर पैसे परत मिळण्याची हमी नसते.

त्यामुळे या व्यवहारात विश्वास व सुरक्षितता महत्त्वाची मानून घर, जमिनी नावावर करून घेण्याचे फॅड वाढले आहे आणि याचाच फायदा बहुतांश सावकार घेऊन मुद्दल, पठाणी व्याजावरून जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा प्रकारचे भिगवण पोलिस ठाण्यात 2022 या वर्षात तीन सावकारीचे प्रकार घडून 12 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अर्थात सावकारांच्या दहशतीमुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. सावकारांच्या वाढत्या जाचामुळे अलीकडे महाराष्ट्र सावकरकी प्रतिबंध कायद्यात मोठे बदल करण्यात आले असले तरी बोक्याच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा प्रश्न तेवढाच अनुत्तरीत आहे.

अवैध भिशीचे पेव
अवैध सावकारकी किंवा भिशी असो या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भिगवणमध्ये अवैध भिशीचे पेव मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना काळ व वाढत्या महागाईने आधीच भल्याभल्या व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भिशीचालकांच्या कपट चालीत अनेकजण अडकून रसातळाला गेल्याची उदाहरणे भिगवणमध्ये कमी नाहीत. एक लाखापासून पन्नास लाखांपर्यंत भिश्या येथे चालवल्या जात असून, भिशीच्या माध्यमातून इंदापूरपेक्षा मोठा फसवणुकीचा प्रकार येथे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सावकारकीची पाळेमुळे ग्रामीण भागात
या सावकरकीची पाळेमुळे शेटफळगढे, तक्रारवाडी, कुंभारगाव, पोंधवडी, स्वामी चिंचोली, डिकसळ, राजेगाव आदी 25 ते 30 गावांत रुजली आहेत. गरीब, मेटाकुटीला आलेला शेतकरी, लहान-मोठे व्यावसायिक, मुलांचे शिक्षण, विवाह, दवाखाना व इतर कौटुंबिक अडचणीत असलेले नागरिक मजबुरीने या सावकारकीच्या जाळ्यात अडकले आहेत.

Back to top button