पवन मावळात दुग्धव्यवसायाला सुगीचे दिवस | पुढारी

पवन मावळात दुग्धव्यवसायाला सुगीचे दिवस

शिरगाव : पुढारी वृत्तसेवा :  दुधाला वाढता भाव आणि शेतीपूरक व्यवसाय करता येत असल्याने तरुणवर्ग या व्यवसायाकडे वळला असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. त्यामुळे पवन मावळात सध्या दुग्ध व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहे.

तरुण पिढी उतरली व्यवसायात
या व्यवसायात सध्या 25 ते 35 वयोगटांतील तरुण येत आहेत. या व्यवसायाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ते धडपड करत असल्याचे चित्र या भागात दिसत आहे. पूर्वीपासूनच दुग्ध व्यवसाय म्हणजे मावळवासीयांचा कणा होता. येथील शेतकरी आपल्या पिढ्यांपिढ्या हा व्यवसाय करत आलेला आहे आणि याच व्यवसायामुळे आर्थिक घडी बसवली असल्याचे अनेक शेतकरी मोठ्या आनंदाने सांगतात.

अनेकांचा जमिनी विकण्याकडे झपाटा
मावळवासीयांना पवनानदी ही अखंड वाहिनी लाभल्याने शेतीला पाणी कमी पडण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. शिवाय काळीभोर जमीन असल्याने जनावरांचा चारा विकत आणण्याची गरज भासली नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून प्रत्येक घरात रात्रंदिवस दुधाचा राबता असायचा. परंतु, अलीकडील काळात जागतिकीकरणाच्या नावाखाली नवीन आणि कमी वेळात जास्त पैसा देणार्‍या उद्योगांनी या भागात शिरकाव केला आहे. त्यात जमिनीला सोन्याचा भाव आल्याने विलासी वृत्ती वाढली आहे आणि हळूहळू या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

20 ते 30 टक्के दुधावर प्रक्रिया
सोमाटणे, शिरगाव या भागात रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे दुधाला मागणी वाढली आहे. आज दुधाला भावही चांगला मिळत असल्याने या व्यावसायिकांचे 70 ते 80 टक्के दूध स्थानिक पातळीवरच लहान- लहान व्यावसायिकाला किंवा रतिबावरच विकले जाते. उर्वरित 20 ते 30 टक्के दूध हे प्रक्रिया करून किंवा दूधसंकलन केंद्राकडे पाठविले जाते. यामुळे पवन मावळ परिसरातील गावातील पुन्हा दुग्ध व्यवसायाने कात टाकली असल्याचे दिसत आहे.

 

गेल्या तीन ते चार वर्षांत या भागात नवीन व्यावसायिक वाढले आहेत. यातील बहुतेक व्यावसायिक हे तरुण म्हणजे 25 ते 30 वर्षीय आहेत. शिवाय दुधाला भाव वाढल्याने चारा घेण्याच्या संख्येत कमी झाली नाही.
                                                                       – शेखर मुर्‍हे, शेतकरी

 

दुग्ध व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड
शिरगाव, साळुंब—े, गोडूंब—े, दारूंब—े, सोमाटणे, गहुंजे, परंदवडी, कासारसाई, सांगवडे, चांदखेड आदी गावांतील सुशिक्षित तरुणवर्ग या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. या व्यवसायाला परंपरेबरोबर तंत्रज्ञानाची सांगड घालून या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आजचा तरुण शेतकरी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. आज या भागातील प्रत्येक गावात 5 ते 10 युवा शेतकरी निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे 10 ते 70 गायी किंवा म्हशी असे पशुधन आहे. यात सोमाटणे येथील मुकुंद मुर्‍हे, प्रवीण मुर्‍हे, शिरगाव येथील मारोती गोपाळे, संदीप अरगडे, धनंजय अरगडे, नवनाथ गोपाळे आदी शेतकर्‍यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत चालली आहे.

Back to top button