पिंपरी : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा निर्णय आयुक्तांच्या हातात | पुढारी

पिंपरी : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा निर्णय आयुक्तांच्या हातात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व पार्किंग समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने मोठा गाजावाजा करीत सशुल्क वाहनतळ (पे अ‍ॅण्ड पार्क) योजना सुरू केली. मात्र, वाहनचालकांकडून अल्प प्रतिसाद आणि वाहतूक पोलिसांकडून सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने संबंधित ठेकेदारांने काम बंद केले आहे. त्यामुळे या पुढे ती योजना सुरू ठेवायची किंवा नाही, त्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे घेणार आहेत.

वाहतूक पोलिसांना दिली टोईंग व्हॅन
शहरात लोकवस्ती वाढीसोबतच वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहतूक व पार्किंगच्या समस्येने गंभीर स्वरूप घेतले आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेने पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू केली. शहरातील 396 ठिकाणी ती योजना सुरू करण्यासाठी रस्ते रंगरंगोटीसह शेकडो फलक लावण्यात आले. तसेच, वाहतूक पोलिसांना टोईंग व्हॅन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अनेक चालक पैसे देत नसल्याच्या तक्रारी
ठेकेदार निर्मला ऑटो केअर यांच्याद्वारे पहिल्या टप्प्यात शहरातील 80 ठिकाणी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मात्र, वाहनचालक पैसे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, नागरिक उद्धटपणे बोलत शिवीगाळ करत असल्याचे प्रकारही घडले आहेत. दुसरीकडे, वाहतूक पोलिस बेशिस्त वाहनांवर कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. काही मोजके रस्ते सोडले तर, वाहतूक पोलिस नियमितपणे कारवाई करीत नाहीत. बेशिस्तपणे वाहन लावण्याचे प्रकार वाढले असून, वाहनचालक शुल्क देत नाहीत. त्यामुळे ठेकेदाराने काम बंद करण्याबाबतचे पत्र पालिकेस दिले आहे. त्यानंतर पालिकेने सध्या शुल्क घेणे बंद केले आहे.

Back to top button