पुणे : सुटता सुटता काही मिनिटांसाठी पुण्यात दिसले ग्रहण! | पुढारी

पुणे : सुटता सुटता काही मिनिटांसाठी पुण्यात दिसले ग्रहण!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आकाशातील धुके, हवेतील प्रदूषण व लाइट प्रदूषणामुळे पुण्यात चंद्रग्रहण दिसले नाही. नेमके ग्रहण सुटण्याच्या वेळेस काही मिनिटांसाठी ग्रहण दिसल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले. तर दुसरीकडे पुण्यातील ‘आयुका’ने ग्रहण पाहण्याची सोय यू-ट्यूबवर लिंक देऊन केली होती. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये जवळपास 30 मिनिटे ग्रहण पाहता आल्याची माहिती आकाश निरीक्षक डॉ. प्रकाश तुपे यांनी दिली.

पुण्यातील आकाश निरीक्षक डॉ. प्रकाश तुपे व मराठी विज्ञान परिषदेचे विनय आर. आर. यांनी ग्रहणाबद्दल माहिती देताना सांगितले की, चंद्रोदय वेळेतच ग्रहण आल्याने ग्रहण सुटता सुटता काही मिनिटांसाठी पुण्यात पाहता आलेले आहे. आकाशातील धूर, हवेतील प्रदूषण व लाइट प्रदूषणामुळे ग्रहण अवस्था अनुभवणे कठीण गेले. पुण्यातील काही खगोलप्रेमी व अभ्यासकांनी ग्रहण पाहण्यासाठी पर्वती, तळजाईसारख्या उंच ठिकाणी जाऊन ग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. पुणे शहरात सायंकाळी चंद्रोदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत चंद्रबिंब ग्रासलेले पाहायला मिळाले. चंद्रोदयानंतर थोड्याच वेळात ग्रहण संपणार असल्याने शहरातील नागरिकांनी उंच ठिकाणावर गर्दी केली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने ग्रहण पाहता आले नाही. तर दुसरीकडे महाबळेश्वर येथे सुमारे 30 मिनिटे ग्रहण पाहता आल्याची माहिती डॉ. तुपे यांनी दिली. ग्रहणकाळात मंदिरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

Back to top button