काम ४ दिवसांचे अन् खर्च ११ दिवसांचा! फिरत्या हौद कामात गोलमाल | पुढारी

काम ४ दिवसांचे अन् खर्च ११ दिवसांचा! फिरत्या हौद कामात गोलमाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. दरम्यान, महापालिकेच्या उधळपट्टीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी चार दिवसांचे काम असताना महापालिकेने थेट अकरा दिवसांसाठी फिरते हौद भाड्याने घेतले आहेत. त्यामुळे फिरत्या हौद कामात ४६ लाखांत होऊ शकणाऱ्या कामासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. पालिकेला ८० लाखांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. फिरते हौद गाड्यांचा हा काय गोंधळ आहे, पाहा.

यंदा कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेने दरवर्षीप्रमाणे शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी टाक्यांची सोय केलेली नाही. तर नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या विसर्जन गाडीद्वारे विसर्जनाची सोय केली आहे. त्यासाठी घनकचरा विभागाने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात एकूण सहा निविदा आल्या होत्या.

सिद्धी ॲडव्हर्टायझिंग या कंपनीने ६० वाहनासांठी ११ दिवसांसाठी प्रत्येकी २ लाख १० हजार ३३१ रुपये हा सर्वात कमी दर दिला. त्यानुसार या कंपनीला काम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

असा आहे सगळा गोलमाल

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या कामासाठी महापौर निधीतून ९९ लाखांची तरतूद उपलब्ध करून दिली. मात्र, या निविदा वाढीव दराने आली. यासाठी १ कोटी २६ लाख १९ हजार ६८० रुपये खर्च होणार आहे. मात्र, यामधील खरा गोलमाल असा आहे की प्रशासनाने गणेशोत्सवाच्या ११ दिवसांसाठी फिरत्या हौदांसाठी ६० गाड्या भाड्याने घेतल्या.

एका गाडीला दिवसाला प्रतिगाडी १९ हजार १२१ रुपये भाडे आहे. मात्र, गणेश उत्सव हा बारा दिवसांचा असला तरी प्रत्यक्षात मात्र दीड दिवस, पाचवा दिवस, सातवा दिवस व अनंत चतुर्दशी या चारच दिवशी या विसर्जनासाठी गाड्या फिरणार आहेत. उर्वरित सात दिवस या गाड्या बंदच राहणार आहेत.

विसजर्याजनासाठीच्या फिरत्या गाड्यांच्या चालकांनीच यासंबंधीची ही माहिती दै. पुढारीला दिली. असे असताना प्रशासनाने मात्र ११ दिवसांच्या हिशोबाने आता संबंधित ठेकेदार कंपनीला १ कोटी २६ लाख १९ हजार ६८० रुपये देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवला आहे.

जर प्रत्यक्ष कामानुसार सात दिवसांचेच बिल दिले गेले. तर या कामासाठी ४५ लाख ८९ हजार ४० रुपये खर्च आला. पालिकेची ८० लाख ३० हजारांची बचत झाली असती. याबाबत पालिकेच्या घन कचरा विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

स्थायी समितीच्या मंजुरीविनाच काम सुरू !

विसर्जनासाठी फिरत्या गाड्या भाड्याने घेण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. गेल्या आठवडयात स्थायी समितीपुढे घाईघाईने मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ही सभा तहकूब झाल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता.

आता थेट गणेशोत्सव सुरू झाल्याने प्रशासनाने या गाड्या घेतल्या आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीविनाच हे काम सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. आता प्रत्यक्षात स्थायी पुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी येईल. तेव्हा त्यास मंजुरी दिली जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

हेही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

पहा व्हिडिओ : पाहूया गौरीच्या नैवैद्याची मिक्स भाजी आणि थापट वडी कशी करायची | Gauri Special recipe

Back to top button