उपचारात दिरंगाई होऊन मृत्यू झाल्यास डॉक्टरचे निलंबन | पुढारी

उपचारात दिरंगाई होऊन मृत्यू झाल्यास डॉक्टरचे निलंबन

कोल्हापूर ; अनिल देशमुख : उपचारात दिरंगाई होऊन रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यास निलंबित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्याची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचनाही सर्व आरोग्य उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत.

एका घटनेत छातीत दुखत असल्याने उपचारासाठी एक रुग्ण चालत रुग्णालयाच्या अपघात विभागात आला. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला अतिदक्षता विभागात पाठवले. तिथे बेड नसल्याने त्याला अन्य रुग्णालयात पाठविले. तिथेही केसपेपरवरील नोंदी नसल्याने त्याला पुन्हा बाह्य रुग्णालयात पाठविले. या सर्व विभागांत रुग्ण स्वत: चालतच फिरत होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सध्या विभागीय चौकशी सुरू आहे. रुग्णांवर वेळेत उपचार झाले नाही, उपचारात दिरंगाई झाली, असा आरोप अनेकदा होत असतो. त्यातून रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांना मारहाण असेही प्रकार होत असतात.

शासकीय आरोग्य केंद्र, रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांवर, रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍याच्या दिरंगाईमुळे रुग्ण एका विभागातून दुसर्‍या विभागात उपचारासाठी फिरत राहिला, त्यादरम्यान त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले तर संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यास कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चा भंग केल्याबद्दलही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे आरोेग्य विभागाने याबाबत काढलेल्या परित्रकात स्पष्ट केले आहे.

वेळेत उपचार होण्यासाठी निर्णय

रुग्ण रुग्णालयात पोहोचूनही केवळ वैद्यकीय अधिकार्‍याच्या अनास्थेमुळे त्याला जीव गमवावा लागला. वैद्यकीय उपचारात दिरंगाई होणे, केसपेपर अथवा त्यावरील नोंदी नसल्याच्या कारणाने उपचार मिळत नसतील तर ते गैर आहे, असे स्पष्ट करत या घटनेची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, रुग्णांना वेळेत उपचार मिळावे, याकरिता आरोग्य विभागाने कठोर निर्णय घेतला आहे.

Back to top button