लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राजकीय मंचावर - पुढारी

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राजकीय मंचावर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या 16 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणेकर यांच्यासह आणखी पंधरा ते वीस कलाकार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

लावणीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या पुणेकर या मराठी बिग बॉस या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. आता त्यांनी राजकीय मंचावर येण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः पुणेकर यांनी माध्यमांना रविवारी दिली.

पूर्वी उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मागितली होती. त्यानंतर कार्यक्रमामुळे राजकीय पक्षांपासून दूर राहिले. मात्र आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 16 सप्टेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहे.

माझ्यासमवेत 15 ते 20 लोककलावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मी पक्षाकडे कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button