येरवडा : विमानतळ रस्ता होणार सिमेंटचा; महापालिका प्रशासनाचा निर्णय | पुढारी

येरवडा : विमानतळ रस्ता होणार सिमेंटचा; महापालिका प्रशासनाचा निर्णय

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे त्याची खडी सर्वत्र पसरून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या विरोधात लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि विविध पक्षांनी गेल्या काळात आवाज उठविला होता. त्याची दखल घेऊन अखेर विमानतळापासून ते विश्रांतवाडी, तसेच नागपूर चाळपर्यंतचा रस्ता महापालिका आता सिमेंट काँक्रिटचा करणार आहे.

त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली. वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्यांची पावसाळ्यात खड्डे पडून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यात प्रामुख्याने विमानतळाकडे जाणार्‍या 509 चौक ते विश्रांतवाडी या रस्त्याची बिकट अवस्था झाली होती.

यामुळे सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवून ते सुस्थितीत करावे, तसेच 509 चौक ते विश्रांतवाडी या रस्त्याचे निकृष्ट काम करणार्‍या संबंधित ठेकेदारावर कारवाई करून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार सुनील टिंगरे, सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार, मनसेचे शाम ताटे, राहुल प्रताप, यश चव्हाण आदींनी केली होती.

आयुक्तांनी या मागणीची दखल घेऊन वडगाव शेरी मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी 41.75 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच विमानतळ- 509 चौक – टिंगरेनगर – विश्रांतवाडी हा रस्ता आता सिमेंट काँक्रीटचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वडगाव शेरीतील रस्ते आणि मंजूर निधी (रुपयांत)
श्र विश्रांतवाडी – टिंगरेनगर 509 चौक विमानतळ 18 कोटी 30 लाख
श्र पुणे नगर रोड रिसर्फेसिंग 15 कोटी
श्र बिशप स्कूल ते ब्रह्मा सनसिटी वडगाव शेरी 7 कोटी 25 लाख
श्र 509 चौक ते नागपूर चाळ 1 कोटी

Back to top button