वेल्हे : धरणात पडून महिला बेपत्ता | पुढारी

वेल्हे : धरणात पडून महिला बेपत्ता

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पुणे- पानशेत रस्त्यावर कुरण गावाच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ खडकवासला धरणात अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून पुण्याकडे जाणारी महिला कोसळून बेपत्ता झाली आहे. अलका विनायक राऊत (वय 34, मूळ रा. घिसर, ता. वेल्हे, सध्या रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. धरणाच्या तिरावर असलेल्या झाडात अडकलेल्या अवस्थेत अलका यांची अक्टिव्हा सापडल्याने त्या धरणात कोसळून बेपत्ता झाल्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

शुक्रवारी (दि. 4) वडगाव बुद्रुक येथून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून वेल्हे पोस्ट ऑफिसमध्ये अलका राऊत आल्या होत्या. वेल्हे येथे त्यांचा चुलतभाऊ सुरेश नथू दिंडले यांना त्या भेटल्या. नंतर त्या पुण्याकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र त्या घरी पोहोचल्या नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी अलका यांचा शोध घेत असताना त्यांची अ‍ॅक्टिवा गाडी कुरण गावाच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या तीरावर झाडात अडकलेल्या अवस्थेत सापडली.

वेल्हेचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार म्हणाले, शनिवारी (दि. 5) स्थानिक मच्छीमार तसेच पीएमआरडीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धरणात शोधकार्य सुरू केले आहे. अंधार पडल्याने सायंकाळी उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार आहे.

Back to top button