कात टाकणार ‘लालपरी’; लवकरच पुणे विभागात नव्या 80 बस होणार दाखल | पुढारी

कात टाकणार ‘लालपरी’; लवकरच पुणे विभागात नव्या 80 बस होणार दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘गड्या आपली लालपरीच बरी’ म्हणत बहुतांश प्रवासी या एसटी बसनेच प्रवास करतात. मात्र, या गाड्यांचे आयुर्मान संपल्याने प्रवाशांचे हाल होत होते. त्याची दखल एसटी प्रशासनाने घेतली असून, लवकरच पुणे विभागासाठी 80 नव्या कोर्‍या लालपरी मिळणार आहेत. तसेच विभागातील 200 जुन्या गाड्या भंगारात काढल्या जाणार आहेत.

एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या ताफ्यात सध्या लाल रंगाच्या 448 बस आहेत. त्यातील 200 बसचे आयुर्मान संपल्याने त्या प्रशासनाकडून स्क्रॅपमध्ये काढल्या आहे. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाला नव्या बसची गरज असल्याने लवकरच नव्या 80 बस विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्याची निविदा प्रक्रियादेखील मंजूर झाली आहे. या गाड्या भाडेतत्वावरील असणार आहेत. यासोबतच यापूर्वी एसटीच्या पुणे विभागात नव्या 2 ई-बस दाखल झाल्या आहेत आणि आणखी नव्या इलेक्ट्रिक बसदेखील येणार आहेत. त्यामुळे लालपरी बससह एसटीचा पुणे विभागसुद्धा आता कात टाकणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महसूलात भारी
लालपरीनेच अखेर एसटी महामंडळाला तारले असून, शिवनेरी, शिवशाहीला मागे टाकत पुणे विभागात विक्रमी 110 कोटी उत्पन्न कमावून दिले आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2022 या पाच महिन्यांच्या काळात प्रवाशांनी शिवनेरी, शिवशाही आणि हिरकणीपेक्षा लालपरीतून सर्वाधिक प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्याद्वारे एसटीच्या पुणे विभागाला एकूण 163 कोटी 98 लाख 3 हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. यातील 110 कोटींचे उत्पन्न फक्त लालपरीनेच महामंडळाला मिळवून दिले आहे.

पुणे विभागातील एसटीच्या गाड्यांची संख्या
लालपरी – 482
शिवनेरी – 66
शिवशाही – 79
स्लीपर – 02
शिवाई – 01
मिडी – 15
एकूण बस – 652

Back to top button