पुणे : दूध विक्रीत एक ते दोन रुपयांची छुपी दरवाढ | पुढारी

पुणे : दूध विक्रीत एक ते दोन रुपयांची छुपी दरवाढ

किशोर बरकाले
पुणे : गायीच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटरला 54 रुपयांपेक्षा अधिक नसावा, असा निर्णय राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने नुकताच घोषित करताना डिलर ते एमआरपीमधील तफावत कमी करण्याची घेतलेली भूमिका जागेवरच राहिली आहे. याउलट ग्राहकांवर दरवाढीचा बोजा पडणार नसल्याचे सांगताना प्रत्यक्षात 2 नोव्हेंबरपासून बहुतांशी सहकारी व खासगी दूध संघांनी गायीच्या दुधाच्या विक्री दरात लिटरला थेट 1 ते 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यानुसार लिटरला 53 ते 54 रुपयांची पातळी गाठत शेवटी ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड दिला आहे.

मागील रविवारी (दि.30) कल्याणकारी संघाची बैठक कात्रज मुख्यालयात दुपारी झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतही संघाच्या पदाधिकार्‍यांनी दुधाची अधिकतम किंमत लिटरला 54 रुपयांपेक्षा जास्त नसावी. तसेच डिलर ते एमआरपी दरात सध्या लिटरला 12 ते 14 रुपये असलेली तफावत 5 रुपयांपेक्षा जास्त नसावी, असे धोरण ठरल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्राहकांवर बोजा पडणार नाही, असेही एकमताने ठरल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

रविवारी प्रत्यक्षात गायीच्या दुधाची विक्री 52 ते 54 रुपये दराने होत होती. त्यामध्ये कमी दर असलेल्या ब—ॅण्डधारकांकडून वाढ होणे अपेक्षित नव्हते. मात्र, एकीकडे 54 रुपयांपेक्षा जास्त दर नसावा, असे स्पष्ट करताना ज्यांचा त्यावेळी प्रतिलिटरचा दुधाचा दर 51 ते 52 रुपये होता, त्यांनी 54 केला आहे. तर काहींनी 51 रुपयांचा दर 53 रुपये केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कल्याणकारी संघाच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार ग्राहकांसाठीच्या विक्री दरात केली जाणारी दूध दरवाढ प्रत्यक्षात जाहीर करण्यात आली नव्हती.

तर 54 पेक्षा कमी दर असणार्‍या ब—ॅण्डधारकांनीही छुपी दरवाढ लागू करण्याची मोकळीकच या बैठकीने दिल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट झाली आहे. या दरवाढीबाबत संबंधितांशी संपर्क साधला असता कल्याणकारी संघाकडून कोणीही पदाधिकारी आता बोलण्यास तयार नाही. मुळात गायीच्या 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाची खरेदी बहुतांशी ठिकाणी लिटरला 35 ते 37 रुपयांदरम्यान आहे.

त्यानुसार विक्री दर पहिलेच एक ते दोन रुपयांनी वाढून 49 वरून 51 ते 52 रुपयांवर पोहोचले होते. मोजक्याच दूध ब—ॅण्डधारकांकडील दुधाच्या विक्रीचा दर 54 रुपये होता. तो आता सरसकट 53 ते 54 रुपये झाल्याचे स्पष्ट झाले असून, शेवटी छुपी दूध दरवाढ करून ग्राहकांवरच बोजा टाकण्यात कल्याणकारी संघाने धन्यता मानल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button