पुणे : चोर सोडून संन्याशाला फाशी; महावितरणच्या कारभाराचा नागरिकांना फटका | पुढारी

पुणे : चोर सोडून संन्याशाला फाशी; महावितरणच्या कारभाराचा नागरिकांना फटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बिल्डरने बसविलेल्या व्यावसायिक वीजमीटरची थकबाकी भरल्याशिवाय नवीन घरगुती मीटर मिळणार नाही, असा पवित्रा महावितरणने घेतल्याने नर्‍हे येथील 40 सदनिकाधारकांची चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान, याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर महावितरणने थकबाकीमध्ये सूट देण्याची भूमिका घेतली आहे. महावितरणचा हा कारभार ”चोर सोडून सन्याशाला फाशी” देण्याचा प्रकार असल्याची टीका केली जात आहे.

नर्‍हे येथील मानाजीनगर परिसरात बांधकाम व्यावसायिकाने 50 सदनिकांची इमारत बांधली आहे. बिल्डरने 2015 मध्ये या ठिकाणी महावितरणकडून व्यावसायिक स्वरूपाचे वीजमीटर बसविले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 2019 मध्ये सदनिकाधारक इमारतीमध्ये राहण्यास गेले. तेथील 10 सदनिकाधारकांना महावितरणने घरगुती स्वरूपाचे वीजमीटर जोडून दिले.

मात्र, उर्वरित 40 सदनिकाधारकांनी घरगुती मीटर बसविण्यासाठी महावितरणला प्रस्ताव दिल्यानंतर बिल्डरने व्यावसायिक स्वरूपाच्या वीजमीटरचे 8 लाख 86 हजार 900 रुपयांचे बिल थकविले आहे, ती थकबाकी भरल्यानंतरच घरगुती स्वरूपाचे वीजमीटर मिळेल, असा पवित्रा घेतला. त्यामुळे सदनिकाधारकांसमोर संकट उभे राहिले होते. याबाबत रहिवाशांनी वारंवार महावितरणच्या अधिकार्‍यांकडे दाद मागूनही दखल घेतली जात नव्हती. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.

महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी सदनिकाधारकांसह दिवाळीपूर्वी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर महावितरणने नमती भूमिका घेत थकबाकीमध्ये 35 टक्के सवलत देण्याचे मान्य केले आहे. असे असले तरी सदनिकाधारकांना किमान पाच लाखांची थकबाकी भरावी लागणार आहे.

बिल्डरच्या चुकीची शिक्षा महावितरण सदनिकाधारकांना देत आहे. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर नवीन घरगुती वीजमीटर देण्याची महावितरणची भूमिका चुकीची आहे. महावितरणने नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा संबंधित बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.
                                                      – भूपेंद्र मोरे, सरचिटणीस, राष्ट्रवादी

Back to top button