इंदोरी: कुऱ्हाडीने घाव घालून बापानेच केला मुलाचा खून | पुढारी

इंदोरी: कुऱ्हाडीने घाव घालून बापानेच केला मुलाचा खून

इंदोरी: कुऱ्हाडीने घाव घालून बापाने मुलाचा खून केला. मी पोराला मारले म्हणून बाप घराबाहेर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी तीन वाजता बोरकरवाडी येथे घडली. समीर बाळू बोरकर (वय 34, रा. बोरकरवाडी, सुदुंबरे, ता.मावळ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी बाळू बबन बोरकर (वय 55) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समीर याच्या भावाच्या पत्नीने (वय 28) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू हा शेती आणि पशुपालन करत होता. मुलगा समीर हा नियमीत काम करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याच्या वागणूक आणि सवयींमुळे त्याचे लग्न जमत नसल्याने वडील बाळू आणि समीर यांचा वारंवार वाद होत असे. बाळू यांची थोरली सून फिर्यादी पूनम मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी दिर समीर हा टीव्ही पाहत हॉलमध्ये झोपला होता. बाळू अचानक घरी आले, त्यांनी कुऱ्हाड उलट्या बाजूने समीरच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला. बाळू रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन ‘मी समीरला मारले’ असे म्हणत बाहेर आल्यानंतर पूनम यांनी हॉलमध्ये जाऊन बघीतले असता समीर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी बाळू याला ताब्यात घेतले आहे.

या खुनाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार पांडे यांनी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन केले. आरोपीला अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार पांडे करत आहेत.

आरोपी बाळू बोरकर याने त्याचा मुलगा समीर बाळु बोरकर यास घरगुती वादातुन त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने रक्तस्त्राव होऊन समीरचा मृत्यु झाला.
– रणजित सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Back to top button