पिंपरी : दागिने चोरणार्‍या केअरटेकरला ठोकल्या बेड्या | पुढारी

पिंपरी : दागिने चोरणार्‍या केअरटेकरला ठोकल्या बेड्या

पिंपरी : वृद्धाश्रमातून दागिने चोरणार्‍या केअरटेकर तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन लाख 35 हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली. संकेत माणिकराव झाडे (20, रा. सूस, ता. मुळशी, मूळ रा. खोक, ता. जिंतूर, जि. परभणी) असे अटक केलेल्या केअरटेकरचे नाव आहे. याप्रकरणी गोकर्णा बाबासाहेब बाभळकर (44, रा. सुस, ता. मुळशी) यांनी हिंवजडी पोलीस ठाण्यात 16 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सूस येथे जिव्हाळा वृध्दाश्रम चालवितात. या वृद्धाश्रमात संकेत झाडे हा केअरटेकर म्हणून कामाला होता. दरम्यान, फिर्यादी यांनी 19 ऑगस्टला किचनमध्ये 47 ग्रॅमचे सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यानंतर आरोपी झाडे 11 ऑक्टोबरला त्याच्या गावी गेला. फिर्यादी यांनी 16 ऑक्टोबरला दागिने पाहिले असता मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी झाडे याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार, परभणी जिल्ह्यातील खोक येथे हिंजवडी पोलिसांचे पथक रवाना झाले. तेथून संकेत झाडे याला ताब्यात घेऊन 18 ऑक्टोबर रोजी अटक केली. चोरी गेलेल्या सोन्याच्या चार अंगठ्या, एक ब्रेसलेट व एक सोनसाखळी असे एकूण दोन लाख 35 हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी झाडे याच्याकडून हस्तगत केले. पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी कारवाई करण्यात आली.

Back to top button