पुरंदर विमानतळ प्रकल्पासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक | पुढारी

पुरंदर विमानतळ प्रकल्पासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत उच्चाधिकार समितीची बैठक येत्या आठ दिवसांत होणार आहे. त्यामध्ये भूसंपादन, भूसंपादन अधिसूचना, प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या मोबदल्याचे पर्याय, विमानतळासोबत करण्यात येणारे बहुउद्देशीय माल वाहतूक व साठवणूक केंद्र (मल्टिमॉडेल लॉजिस्टिक हब) याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

पुरंदर येथील नियोजित विमानतळ प्रकल्प जुन्या जागेतच करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि जिल्हा प्रशासनाला प्रकल्पाबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) देण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार दोन्ही यंत्रणांनी अहवाल एमआयडीसीकडे सुपूर्त केला आहे. प्रकल्पाचे भूसंपादन एमआयडीसीच्या भूसंपादन कायद्यानुसार करण्यात येणार असल्याने एमआयडीसीने भूसंपादन अधिसूचना काढल्यानंतरच जिल्हा प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उच्च अधिकार समितीच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button