पुणे : गायीच्या दुधाचा विक्री दर 54 पेक्षा अधिक नसणार | पुढारी

पुणे : गायीच्या दुधाचा विक्री दर 54 पेक्षा अधिक नसणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दूध खरेदी व विक्री दरात सर्वत्र एकवाक्यता असावी, दूध विक्री दरात वाढ करताना ग्राहकांसाठी दुधाची अधिकतम किंमत तथा एमआरपी लिटरला 54 रुपयांपेक्षा जास्त नसावी. तसेच, डिलर ते एमआरपी दरात सध्या लिटरला 12 ते 14 रुपये असलेली तफावत कमी करून ती 5 रुपयांपेक्षा जास्त नसावी, असे धोरण असावे, असे रविवारी झालेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया विक्री कल्याणकारी संघ या राज्यातील सहकारी व खासगी दूध ब्रँडधारकांच्या बैठकीत ठरविण्यात आले.

या निर्णयामुळे ग्राहकांवर बोजा पडणार नसून, त्याची अंमलबजावणी एकमताने करण्याचे ठरले आहे. चितळे डेअरीचे संचालक श्रीपाद चितळे यांनी सुचविलेल्या या ठरावास संगमनेर तालुका सहकारी संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी अनुमोदन दिले. पुण्यातील कात्रज मुख्यालयात दुधाच्या खरेदी-विक्री दर आणि अन्य अडचणींवर बैठक झाली. अध्यक्षस्थानी कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के हे होते. त्यामध्ये ग्राहकांसाठी दूध विक्री दर प्रतिलिटरला 54 रुपयांपेक्षा अधिक नसावा आदींसह अन्य चार ठराव सर्वानुमते मंजूर झाले आहेत. सध्या गायीच्या दुधाची विक्री 52 ते 54 रुपये दरानेच होत आहे.

या बैठकीस राजहंस, चितळे, शिवामृत, दूध पंढरी, थोटे, स्फूर्ती, संतकृपा, कात्रज, ऊर्जा, सोनाई, पराग, गोविंद, नवनाथ, कन्हैया, कृष्णा, सुरुची, साने, श्री गणेशा आदींसह सहकारी व खासगी दूध ब्रँडधारकांचे सुमारे 35 प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या निर्णयाची माहिती सायंकाळी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर आदींनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील 85 ते 90 लाख लिटरइतक्या पाऊच पॅकिंग व्यवसायात 58 लाख लिटरचा व्यवसाय स्थानिक ब्रँडधारकांकडे असून, परराज्यांतील ब्रँडधारकांनी 32 ते 33 लाख लिटरच्या व्यवसायावर ताबा मिळविला आहे. सुमारे चाळीस टक्के व्यवसाय परराज्यांतील ब्रँडने काबीज केल्यामुळे तीव्र स्पर्धेत स्थानिक ब्रँडधारक मेटाकुटीला आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडर व बटरच्या दरात वाढ झालेली आहे. लम्पी त्वचा रोगामुळे तसेच अतिवृष्टीमुळे दूध उत्पादनात घट झालेली असून, दूध खरेदी दर वाढले आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांना चांगला दर मिळत आहे. मात्र, परराज्यांतील दूध ब्रँडधारक त्यांच्या राज्यात दूध खरेदीसाठी कमी दर देतात आणि महाराष्ट्रात येऊन जादा दराने सोयीच्या ठिकाणी दूध खरेदी करतात. त्याचा परिणाम म्हणून येथील दूध व्यवसायात अनिष्ट स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यावर हा निर्णय घेण्यात आला.

दुधासाठी सर्वसमावेशक धोरण आणा; भेसळखोरांना अटकाव करा
कल्याणकारी संघाच्या बैठकीत अन्य तीन ठराव मंजूर झाले. त्यामध्ये राज्य सरकारने दूध उद्योगासाठी सर्वसमावेशक धोरण आणावे, शासननियुक्त दूध सल्लागार संयुक्त समितीच्या नियमितपणे बैठका घ्याव्यात. तसेच राज्यात पनीरसह दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांना रोखण्यासाठी शासनास सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. भेसळखोरांवर छापे टाकून अटकाव करण्यासाठी दुग्ध विभागात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नेमावेत, असाही ठराव मंजूर करण्यात आला आहे.

Back to top button