पुणे : बाजारात 5 हजार कोटींची उलाढाल | पुढारी

पुणे : बाजारात 5 हजार कोटींची उलाढाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाने दोन वर्षांत निर्माण केलेली मरगळ झटकत यंदा बाजारात आनंद, उत्साहाचे उधाण पाहावयास मिळाले. सराफा बाजारात तरुणाईने मोठी खरेदी केली, हे यंदाचे वैशिष्ट्य ठरले. वाहन खरेदीने सर्व विक्रम मोडीत काढले. चारचाकींना तर दीड वर्षापर्यंतचे वेटिंग लागले आहे. कपडा अन् इलेक्ट्रॉनिक बाजारातही मोठी खरेदी झाली. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार शहराच्या बाजारपेठेत सुमारे पाच हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

यंदाच्या दिवाळीने नागरिकांसाठी नवी आशा आणली. कोरोनाचे सावट पूर्ण गेल्याने नागरिकांत खरेदीचा प्रचंड उत्साह दसर्‍यापासूनच जाणवत होता. दिवळीने तर व्यवसायाला चार चाँद लावले. शेतकरीवर्गावर पावसाने संकट आणल्याने ग्रामीण भागातून येणारी ग्राहकी कमी असली, तरीही त्यांनी खरेदी करताना उत्साह दाखवल्याने यंदा सर्व प्रकारच्या व्यवसायात 35 टक्क्यांची वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून बाजारात प्रचंड गर्दी बघायला मिळाली. यंदा नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा व भाऊबीज एकत्र आल्याने व्यापारी चिंतेत होते. तसेच बाजारावर पावसाचे सावट होते. मात्र, 23 रोजी मान्सून देशातूनच गेल्याने खरेदीला उधाण आले.

पुणेकरांनी वर्षानुसार पाडव्याला खरेदी केलेली वाहने

साल/वर्ष वाहनसंख्या
सन 2022 17 हजार 325
सन 2021 12 हजार 422
सन 2020 15 हजार 644
सन 2019 15 हजार 566

पैठणीने भाव खाल्ला…
दिवाळीपूर्वीच परतीच्या पावसाने अनेक
ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली. ऐन दिवाळीच्या
काळातच पावसाने उघडीप दिल्याने काही प्रमाणात कपड्यांची खरेदी-विक्री झालेली आहे. त्यामध्येही पैठणी साडीला पुणेकर महिलांनी अधिक पसंती दिल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. तरुण-तरुणींचाही ऑनलाइनपेक्षा दुकानात जाऊन खरेदी करण्याकडे अधिक कल या वर्षीच्या दिवाळीत होता. तरुणींनीही भारतीय पारंपरिक वेशातील कपड्यांचीच अधिक खरेदी केली.

11 हजार दुचाकी, 4 हजार चारचाकींची खरेदी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याचा आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत पुणेकरांनी यंदा तब्बल 17 हजार 325 वाहनांची खरेदी केली आहे. यात यंदा सर्वाधिक दुचाकींची खरेदी झाली असून, पुण्यात 11 हजार 143 दुचाकी वाढल्या आहेत. तसेच, चारचाकींचीसुद्धा पुणेकरांनी चांगलीच खरेदी केली असून, तब्बल 4 हजार 249 चारचाकी पुण्यात वाढल्या आहेत. 6 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पुणेकरांनी 17 हजार 335 वाहनांची खरेदी केल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

वसुबारसपासूनच बाजारात गर्दी होती. भाऊबीज व पाडवा एकत्र आल्याने थोडा परिणाम झाला. पण, तो इतर दिवसांनी भरून काढला. तरुणांची मोठी गर्दी सोने खरेदीत दिसली.

                                        – अतुल अष्टेकर, भागीदार के. आर. अष्टेकर ज्वेलर्स

सराफा बाजारात तरुणांचा उत्साह मोठा होता. सोन्याचे दर पंधराशे रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना त्याचा फायदा झाला. लग्नसराईची खरेदी देखील त्यांनी केली.

                                     – कौशिक मराठे, सीईओ, पीएनजी अँड सन्स

मिठाईच्या बाजारात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता. दिवाळीत पाऊस नसल्याने ग्राहकांना बाहेर पडता आले. मिळाईसह तयार फराळ खरेदीकडे ग्राहकांचा ओढा जास्त होता.
– केदार चितळे, भागीदार, चितळे बंधू

या वर्षीच्या दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक दिसून आला. दोन्हींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 30 ते 35 टक्क्यांनी खरेदीमध्ये वाढ झालेली आहे.

                                                 – फत्तेचंद रांका (अध्यक्ष, पुणे सराफ

दिवाळीमध्ये कापड व्यवसायामध्ये किती कोटींची उलाढाल झाली, हे अचूक सांगणे कठीण आहे. तीन वर्षांनंतर कापड व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात माल भरलेला होता. मात्र, पावसामुळे काही प्रमाणात फटका बसला आहे. वस्तू त्याच असून, किमती वाढल्याने मोठी उलाढाल झाल्याचे चित्र जरी दिसत असले, तरी पावसाने काही प्रमाणात खरेदी कमी झालेली आहेच.
                                                  – राहुल येमुल (पेशवाई क्रिएशन्स)

कोरोनाचे संकट दूर झाल्याने बाजारात खरेदीचा मोठा उत्साह या दिवाळीत दिसून आला. अजून तो सुरूच आहे.
                                                – सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

दोन वर्षांनंतर नागरिकांच्या मानसिकतेत मोठे सकारात्मक बदल दिसले. त्यामुळे शहरासह पिंपरी-चिंचवड भागात 60 हजारांच्या वर फ्लॅटची खरेदी झाल्याचा अंदाज आहे.

                            – शांतीलाल कटारिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष, क्रेडाई

सुरुवातीला बाजारात गर्दी चांगली झाली. मात्र, दसर्‍यानंतर पावसामुळे शेतकरी आला नाही. तरुणवर्गात खरेदीचा मात्र उत्साह होता.

                           -सिद्धार्थ शहा, संचालक, चंदुकाका सराफ अँड सन्स

Back to top button