सिंहगड एक्सप्रेसबाबत रेल्वे प्रशासनाचे नियोजन शून्य | पुढारी

सिंहगड एक्सप्रेसबाबत रेल्वे प्रशासनाचे नियोजन शून्य

राहुल हातोले : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील बरेच नागरिक काम-धंद्यासाठी भल्या पहाटेच मुंबईच्या दिशेने धाव घेतात. काहींना तर पहाटे चार वाजताच घर सोडावे लागते आणि सहा वाजता पुणे स्थानकातून सुटणारी सिंहगड एक्सप्रेसने गाठावे लागत आहे.
मात्र, प्रवास करताना नियमित जाणारे काही पासधारक आपल्या सहप्रवाशांसाठी जागा अडवून ठेवत असल्यामुळे वादाची समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. तर रेल्वे पोलिस पुणे स्थानक ते सीएसटीपर्यंत दिसूनच येत नाहीत. जणू रेल्वे पोलिस रेल्वेमधूनच गायब झाले की काय? असा प्रश्न सामान्यांना पडला नाही तरच नवलच. रेल्वे पोलिसांच्या मदतीविना तिकीट तपासणीस तर सामान्य डब्यात जाण्यासही धजावत नाहीत.

यामुळे रेल्वे प्रशासनाचे सिंहगड एक्सप्रेसबाबतचे नियोजन शून्य आहे. अशा तक्रारींचा पाढा ‘दैनिक पुढारी’ने पुणे स्थानक ते सीएसटी स्थानकापर्यर्ंत घेतलेल्या आढाव्यादरम्यान प्रवाशांनी मांडला आहेत.

पुणे स्थानक : पुणे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर गाडीमध्ये चढण्याअगोदरच टीसी हे प्रत्येक प्रवाशांना पुणे स्थानकात खुल्या होणार्‍या बोगीतच बसण्याची माहिती देत असल्याचे दिसून आले. या स्थानकामधून सामान्य डब्बा क्रमांक 5 आणि 6 खुला केला जातो. सकाळी हा डब्बा बर्‍यापैकी मोकळा असतो. मात्र, काही नियमित पासधारक समोरच्या जागेवर आपला बॅग, रूमाल, आणि पेपर अशा वस्तू ठेवून आपल्या सहप्रवाशांसाठी जागा अडवून ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शिवाजीनगर, खडकी : डब्बा क्रमांक 11 हा शिवाजीनगर आणि 10 हा खडकी स्थानकासाठी खुला केला जातो. डब्बा क्रमांक 5,6,10 व 11 या डब्यांमध्ये प्रवाशांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असतेे. मात्र मित्रांसाठी येथेदेखील जागा अडवून ठेवल्या जात आहेत.

शिवाजीनगर, खडकी : डब्बा क्रमांक 11 हा शिवाजीनगर आणि 10 हा खडकी स्थानकासाठी खुला केला जातो. डब्बा क्रमांक 5,6,10 व 11 या डब्यांमध्ये प्रवाशांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असतेे. मात्र मित्रांसाठी येथेदेखील जागा अडवून ठेवल्या जात आहेत.

चिंचवड : या स्थानकामधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. पिंपरीमध्ये निम्मा खुला केलेला डब्बा या स्थानकात पूर्ण खुला केला जातो. डब्बा पूर्ण खुला होईपर्यंत गाडीतील टीसी डब्यातच उपलब्ध असतात. त्यामुळे प्रवाशांना डब्बा योग्यरित्या खुला करण्यात येत आहे. मात्र, अडवून ठेवलेल्या जागांवर कारवाई करण्यास टीसी धजावत नसल्याचे दिसून आले.

पिंपरी : या स्थानकात डब्बा क्रमांक 7 हा निम्मा खुला केला जातो. मात्र, पुणे ते लोणावळा दरम्यानच्या संपूर्ण स्थानकांपैकी पिंपरी आणि चिंचवड या ठिकाणीच प्रवाशांची संख्या अलोट असल्याचे दिसून येत आहे. या अर्धवट डब्यांमध्ये एवढे प्रवासी बसणे अवघड आहे. मात्र, मागील डब्बे मोकळेच आहेत याची माहिती बर्‍याच प्रवाशांना नसल्याने या डब्यात अधिक गर्दी होते.

लोणावळा : या स्थानकात डब्बा क्रमांक 8 व 9 हा खुला करण्यात येतो. रेल्वे प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने प्रवाशांचा घोळकाच एकदम डब्यात शिरतो. परिणामी चालत्या गाडीत एका प्रवाशाने चढण्याचा प्रयत्न केल्याने तो रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रुळाच्यामध्ये पडला. नागरिकांनी त्याला हात देऊन वर काढल्याने थोडक्यात त्याचे प्राण बचावले.

…खंडाळा आणि कर्जत : यानंतर सर्व डब्बे खुले केले जातात. त्यामुळे खंडाळा व कर्जतपर्यंत प्रवाशांची गर्दी कमी असते.

कल्याण : लोकलचा प्रवासी एक्सप्रेसने प्रवास करतो. या स्थानकामधून चढणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुणे,पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. यानंतर दादर आणि मुंबई सीएसटी स्थानकापर्यंत बरेच लोकलचे प्रवासीच एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याने आढळून आले आहे.

 

जागा मोकळ्याच असतात मात्र तरीदेखील बॅग, रूमाल, आणि पेपर ठेवला जातो. या जागेवर प्रवासी बसलेला आहे. तो वॉशरूममध्ये गेला आहे. असे सांगून फसवणूक केली जाते. आणि समोरच्या स्थानकात त्यांचा सहप्रवासी आला की, त्या जागेवर त्याला बसविले जाते. याबाबत तक्रार करायची कोणाकडे ?
                                                                  – संजय चव्हाण, प्रवासी

सिंहगड एक्सप्रेसवर प्रवाशांचा ताण पडण्याची कारणे
सह्याद्री एक्सप्रेस बंद
सिंहगड एक्सप्रेसनंतर काही मिनिटांतच प्रवाशांसाठी असलेली सह्याद्री एक्सप्रेस हा नागरिकांसाठी पर्याय होता. मात्र, कोरोना काळापासून सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आल्याने प्रवाशांचा ताण सिंहगड एक्सप्रेसवर पडला आहे.

सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यांची कपात
कोरोना काळापूर्वी एक्सप्रेसला एकूण बावीस डब्बे होते. मात्र, कोरोनामुळे यामधील पाच डब्ब्यांची कपात करण्यात आली. आता बावीसपैकी सतराच डब्बे खुले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जागा अपुरी पडते. लातूर, महालक्ष्मी, सिद्धेश्वर एक्सप्रेस अशा पहाटे जाणार्‍या गाड्याचे थांबे लोणावळा येथून बंद करण्यात आल्याने, लोणावळा येथील प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

महिला डब्ब्याने करतात पुरुष प्रवास
डब्बा क्रमांक 12 या महिलांच्या डब्यात पुरुषच प्रवास करीत असल्याचे आढळून आले आहे. पुणे स्थानकापासूनच या डब्यात पुरुष उपस्थित होते. मात्र, टीसी आणि रेल्वे पोलिसांचा धाक नसल्याने अशा रितीने प्रवास करणार्‍या प्रवाशांना सवय झाली आहे.

मनोरंजनामुळे गर्दीतही सुखकर प्रवासाचा अनुभव
बसायला जागा नाही, काहींना तर उभे राहायलाही जागा नसते. मात्र अशातच माईक, रेकॉर्डिंग आणि इतर साहित्य घेऊन प्रवासी गाणी म्हणतात. इतरांच्या फर्माइशी ऐकून घेत संपूर्ण डब्यातील प्रवाशांसह स्वतःचाही ताण घालवित सुखकर प्रवास होत आहे.

Back to top button