पुणे : चिवड्यालाही महागाईचा तडका! कच्च्या मालाचे दर वाढले | पुढारी

पुणे : चिवड्यालाही महागाईचा तडका! कच्च्या मालाचे दर वाढले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कुरकुरीत, तसेच खमंग चिवडयासाठी लागणार्‍या भाजक्या6 पोह्यांच्या दरात जुलै महिन्यात झालेली वाढ कायम आहे. गतवर्षीच्या तुलनेत कच्च्या मालाचे वाढलेले भाव, त्यात पाच टक्के जीएसटी लागू झाल्यामुळे जुलै महिन्यापासून पोह्यांच्या दरातील तेजी कायम असल्याने यंदा दिवाळीत चिवड्याची चव तिखटच राहणार आहे.

देशातील गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मोठया प्रमाणावर, तर कोकणातील रोहा आणि पेण परिसरात थोड्याफार प्रमाणात पोह्यांचे उत्पादन होते. मध्यंतरीच्या काळात या पोह्यांसाठी लागणारा कच्चा माल (धान किंवा पॅडी) याचा तुटवडा जाणवत होता. याखेरीज, ज्याठिकाणाहून देशभरात माल पाठविण्यात येतो त्यातील काही ठिकाणी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते.

परिणामी, कच्च्या मालाच्या खरेदीसाठी येथील उत्पादक कंपन्यांनी आपला मोर्चा अन्य राज्यांकडे वळविला. उत्पादनाच्या तुलनेत मागणी खूप मोठी असल्याने स्थानिक बाजारपेठांतील उत्पादक, तसेच प्रक्रिया उद्योजकांनी (मिल) दरात वाढ केली. त्यामुळे पोह्यांच्या दरातही वाढ झाली. याखेरीज, जुलै महिन्यांत केंद्र सरकारने 25 किलोपर्यंतच्या सर्वच प्रीपॅक्ड, तसेच लेबल्ड खाद्यान्न (जीवनावश्यक) वस्तूंना जीएसटी लागू केला. त्याअंतर्गत 25 किलोच्या आतील पॅकिंग असलेल्या व लेबल असलेल्या पोह्यांवरही जीएसटी लागू झाल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारात देशासह राज्याच्या विविध भागांतून चार हजार पोत्यांमधून पोह्यांची आवक होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या पोह्यांची आवक वाढली असून, त्यांना मागणीही चांगली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
                                                        – सुमित गुंदेचा, पोहे व्यापारी, मार्केट यार्ड.

मार्केट यार्डातील भुसार विभागात होणारी आवक व मिळणारे दर
पोहे आवक सरासरी वजन (प्रति पोते) दर
भाजके पोहे 1 हजार 12 किलो 650 ते 750
पातळ पोहे 200 40 किलो 4600 ते 5300
मुरमुरे 1 हजार 500 9 किलो 480
भडंग 500 9 किलो 700 ते 800
मका 750 (बॉक्स) 15 किलो 550 ते 675

Back to top button