बाणेर : अबब! हायवेलगत 31 टन कचरा | पुढारी

बाणेर : अबब! हायवेलगत 31 टन कचरा

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय महामार्गालगत पडणारा कचरा सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. अशातच सुतारवाडी-पाषाण तलावाजवळ महामार्गालगत पडलेला कचरा प्रशासनाने उचलण्याची कारवाई केल्याने एक प्रकारचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
पाषाण तलाव व सुतारवाडी भागाजवळ महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणात कचरा व राडारोडा टाकण्यात येतो. हा कचरा पडू नये म्हणून या ठिकाणी ठोस पावले उचलणे आवश्यक आहेत; परंतु सध्या तरी औंध क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वारंवार हा कचरा उचलून स्वच्छता केली जात असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

या ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत सहायक आयुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले की, मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गेले दोन दिवसांपासून अंदाजे 31 टन कचरा उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन आशा राऊत व उपायुक्त नितीन उदास यांच्या मार्गदर्शनाने उचलण्यात आलेला आहे. या अभियानामध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, निखिल निकम, जालिंदर चांदगुडे, सुरेंद्र जावळे, नितीन लोखंडे व 29 सफाई कामगार यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली आहे.

Back to top button