पुणे : आरटीओच्या सर्व्हर डाऊनचा फटका; तब्बल तीन तास एनआयसी संकेतस्थळ गंडले! | पुढारी

पुणे : आरटीओच्या सर्व्हर डाऊनचा फटका; तब्बल तीन तास एनआयसी संकेतस्थळ गंडले!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वाहन परवाना काढण्यासाठी आवश्यक असलेल्या संकेतस्थळाचा आरटीओत कामासाठी येणार्‍या नागरिकांना बुधवारी मोठा फटका बसला. बुधवारी सकाळी तब्बल तीन तास आरटीओतील कागदपत्रांच्या कामाचा कणा असलेले एनआयसीचे संकेतस्थळ बंद होते. यामुळे येथे आलेल्या नागरिकांचे हाल झाले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनसंदर्भातील विविध कागदपत्रांच्या कामासाठी नागरिक येत असतात. बुधवारी सकाळी आरटीओ कार्यालय सुरू झाल्यानंतर काही वेळाने पुन्हा एनआयसीचा सर्व्हर डाऊन झाला. तब्बल तीन तास हे संकेतस्थळ बंद होते. त्यामुळे पुणे आणि परिसरात हजारो नागरिकांच्या कागदपत्रांची कामे रखडली आणि अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. असाच त्रास गेल्या अनेक दिवसांपासून येथे येणार्‍या नागरिकांना होत असल्याचे येथील बापू भावे यांनी सांगितले.

‘एनआयसी’च्या संकेतस्थळाच्या अपडेटचे काम चालू होते. त्यामुळे फक्त आज अडीच ते तीन तास सर्व्हर डाऊन होता. तीन वाजल्यानंतर संकेतस्थळ पुन्हा सुरू झाले. त्यानंतर सर्व कागदपत्रांची कामे तातडीने पूर्ण करण्यात आली.

                                      – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

 

Back to top button