निमोणे : करडे घाट… ठरतोय नवा मुळशी पॅटर्न! | पुढारी

निमोणे : करडे घाट... ठरतोय नवा मुळशी पॅटर्न!

निमोणे; पुढारी वृत्तसेवा: रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जागा कमी पडू लागल्यामुळे कारखानदारांनी सरदवाडी- करडे परिसरात नवीन कारखानदारी सुरू केली आहे. मात्र, परिसरातील पिट्याभाईंची दहशत पाहता येथेही मुळशी पॅटर्न तयार होतो की, काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरदवाडी घाटावर शिरुर- सातारा महामार्गालगत नवीन कारखानदारी उभी राहात आहे. बाहुबलींचा वाढता राबता बघता येथे भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पाच-पन्नास जणांची टोळी कधीही या परिसरात टेहळणी करताना दिसत असते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कार्यरत बाहुबली ठेकेदारांचे पंटर म्हणून यांचा मागील काही वर्षांपासून बोलबाला आहे.

भंगार, वाहतूक, कामगार ठेका मिळवायचा असेल तर ऑनलाइन टेंडर भरावे लागते. पण, औद्योगिक वसाहतीतील बहुतांशी ठेकेदारांपुढे या कायद्याला कच-याची किंमत आहे. तुमचे हात रक्ताने माखले असतील, पोलिस दप्तरी गुन्हेगार असाल तर तुमच्या हाकेला पाच-पन्नास पंटर धावून येणार असतील तरच तुम्ही ठेकेदारी करायला लायक अन्यथा या वसाहतीमध्ये तुम्हाला शुन्य किंमत असे चित्र आहे. यदाकदाचित सोडतीमध्ये बाहुबलींना डावलून तुम्ही ठेका मिळवलाच तर तुम्ही एक गाडीही भंगार वसाहतीबाहेर घेऊन जाऊ शकत नाही. जीव कोणाला नकोसा झाला आहे ? कुठे अडवतील, कुठे मारतील कशाचाच नेम नाही.

चढ्या भावाने ठेका घेऊन कवडीमोल किंमतीत बाहुबलींना माल देण्याची वेळ अनेकांवर आलेली आहे. घाटाच्या त्या परिसरात सहज कुणी गाडी उभी केली तरी हे बाहुबलींचे पंटर कशाला उभा राहिला, हे सगळे आमचे आहे. उगाच मध्ये याल तर जिवाला मुकाल हीच भाषा बोलतात. परिसरातील उभी राहू पाहत असलेली बेबंदशाही वेळीच खुडून काढली नाही तर थोड्याच दिवसात येथे नवीन मुळशी पॅटर्न झाल्याचे चित्र पहायला मिळेल.

ठेके मिळवण्यासाठी बाहुबलाचा वापर
औद्योगिक वसाहतीमध्ये जे काही लागते ते या बाहुबलींकडूनच घेतले पाहिजे, हा अलिखित नियम आहे. बाहुबलींना डावलून कुणी धाडस केलेच तर सगळ्यात मोठी किंमत कारखानदाराला चुकवावी लागते. कायम त्या कारखानात अशांत वातावरण निर्माण करण्यात हे बाहुबली आघाडीवर असतात. करडे घाटात नवीन कारखानदारी उभी राहते, पण येथील जागेपासून सगळीकडे मनगटशाहीवर श्रध्दा असलेला वर्ग आघाडीवर आहे. जागा सपाट करायचा लावा आमचा ट्रॅक्कर, पाणी, दगड , वीट असो की, कामगार सगळे आमचे घ्या… अद्याप कारखानदारी नीट उभी नाही पण भंगार ठेक्यापासून सगळ्याच गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत, यासाठी अनेकांनी बाह्या सरसावल्या आहेत.

Back to top button