पुणे : साडेसात हजार जणांची पूर्वपरीक्षेला दांडी | पुढारी

पुणे : साडेसात हजार जणांची पूर्वपरीक्षेला दांडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे घेण्यात येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवारी पुणे जिल्ह्यात सुरळीत पार पडली. परंतु नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी तब्बल साडेसात हजार परीक्षार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात एमपीएससी पूर्वपरीक्षेसाठी 40 हजार 01 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 32 हजार 399 परीक्षार्थींनी विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. तर 7 हजार 602 परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर असल्याचे दिसून आले.

पुणे जिल्ह्यातील 102 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 88 केंद्रे पुणे शहरात, 6 खेडमध्ये, 3 पुरंदरमध्ये तर 5 मावळ हद्दीत होती. परीक्षेसंदर्भात उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रांवर अत्यंत चोख बंदोबस्त होता. त्यामुळे कोणताही गैरप्रकार झाला नाही. यापुढे आता वर्णनात्मक परीक्षा द्यावी लागणार असल्यामुळे परीक्षार्थींनी वेळ घेऊन विचारपूर्वक परीक्षा दिली. परीक्षेची उत्तरसूची आल्यानंतरच पेपरचा कटऑफ साधारण काय असेल याविषयी सांगता येणार आहे.

जिल्ह्यातील 102 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत
कोणताही अनुचित प्रकार न होता अत्यंत चांगल्या पद्धतीने संयुक्त पूर्वपरीक्षा पुणे जिल्ह्यात पार पडली. यावेळी परीक्षार्थींची संख्या वाढली होती. त्यामुळे पुणे शहरासह खेड, मावळ, पुरंदर तालुक्यातील केंद्रांवर संबंधित परीक्षा पार पडली. गट अ पदाचे अधिकारी समन्वयक म्हणून सहकारी होते. त्याचबरोबर शनिवारी सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांची शाळा असते. परंतु परीक्षा केंद्र म्हणून शाळा घेतल्यामुळे काही शाळा दुपारी सुरू करण्यास सांगितले. त्यामुळे नियोजनबद्ध रितीने परीक्षा पार पाडली.

                                           – संजय तेली, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी

शनिवारी झालेल्या संयुक्त गट- ब 2022 पूर्वपरीक्षेचा पेपर मध्यम स्वरूपाचा होता. आमच्या परीक्षा केंद्रावर सुरळीत आणि वेळेत परीक्षा पार पडली. जुन्या अभ्यासक्रमानुसार या शेवटच्या परीक्षेची संधी असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर मोठ्या संख्येने हजर असल्याचे दिसले.

                                                         – महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षार्थी

 

Back to top button