पुणे : ड्रेनेज लाईनवरच खांब ! मेट्रोचा प्रताप | पुढारी

पुणे : ड्रेनेज लाईनवरच खांब ! मेट्रोचा प्रताप

पुणे; पुढारी वृत्तसेवा: डेक्कन पुलाचीवाडी येथील बाबा भिडे पुलाजवळच मेट्रो प्रशासनाने ड्रेनेज लाइनवरच स्टेशनवर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या जिन्याचे खांब उभारले. त्यामुळे स्थानिक परिसरात असलेल्या इतर ड्रेनेज लाइन तुंबल्या असून, स्थानिक नागरिकांना ऐन पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुलाची वाडी येथे मेट्रोचे डेक्कन स्थानक आकार घेत आहे. लवकरच ते प्रवाशांसाठी खुले होईल. या स्थानकावर जाण्यासाठी मेट्रो प्रशासनाने जिना तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु, खोदकाम करताना मेट्रो प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने चालू ड्रेनेज लाइन फोडून त्यावरच खांब उभारला. त्यामुळे या परिसरातील इतर ड्रेनेज तुंबल्या आहेत. पाऊस आला की, परिसरातील ड्रेनेज लाइनमधून पाणी निघत आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठा मनस्ताप झाला आहे.

त्यासोबतच अनेकांना डास-मच्छरांच्या माध्यमातून डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मेट्रो प्रशासनाने येथील कामकाजात तत्काळ बदल करून, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या खांब उभारण्याच्या कामाची तातडीने दुरुस्ती करावी, अशा आशयाचे पत्र स्थानिक नागरिक आशिष बाहेती, ज्ञानेश्वर पाटसकर, किशोर पिरगळ, मकरंद कासट, मंगल अनपट, मालन मुळीक, हेमा पवार, गीता भारती यांनी मेट्रो अधिकार्‍यांना दिले आहे.

मेट्रो प्रशासनाने अशा प्रकारे केलेल्या चुकीच्या कामामुळे आम्हा स्थानिक नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून नाहक त्रास झाला आहे. चुकीच्या ठिकाणी खोदकाम केले आणि चालू ड्रेनेज लाइनवरच निम्म्यापर्यंत खांब उभारला. एवढा खांब उभारेपर्यंत अधिकार्‍यांचे लक्ष कुठे होते? आम्हाला याची तत्काळ मेट्रो प्रशासनाने भरपाई द्यावी आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले खोदकाम थांबवावे.

                                                      – मनोज कासट, स्थानिक नागरिक

मेट्रो प्रकल्पासाठी शहरात खोदकाम करताना आम्हाला अनेक ठिकाणी युटिलिटी डायव्हर्जन करावे लागतात. डेक्कन पुलाची वाडी येथील दुरुस्ती करण्यात येणार असून, येथील खोदकामाच्या जागेत तातडीने बदल करण्यात येतील.

                                    – हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

Back to top button