टाकळी हाजी : बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

टाकळी हाजी : बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा: होनेवाडी येथे राहणारे दिलीप बाळा पवार या शेतकर्‍याची गोठ्यात बांधलेली दोन वर्षाची कालवड गुरुवारी (दि. 6) रात्री घरासमोरील डाळिंबाच्या शेतात नेऊन बिबट्याने खाऊन फस्त केली. यामुळे पवार यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कालवड पूर्णपणे फस्त केल्यामुळे दोन बिबटे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच परिसरात राहणारे राहुल खाडे, शंकर घोडे यांना बिबट्याचे या आठवड्यात वारंवार दर्शन झाल्याचे सांगितले. याच आठवड्यात ओंकार आढाव यांचा कुत्रा, जालिंदर घोडे यांचे वासरू आणि वैभव घोडे यांची शेळी बिबट्याने खाल्ली असून भालचंद्र काळे यांच्या मेंढीवर हल्ला केला होता.

परंतु त्यांना जाग आली आणि त्यांनी बॅटरीचा प्रकाश केल्यामुळे बिबट्या पळून गेला; मात्र मेंढीला बिबट्याचे दात लागले आहेत.
अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे होनेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधन धोक्यात आले असून या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा, अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शंकर होने आणि गणेश पवार यांनी केली आहे. पशुधन संरक्षणासाठी शेतकर्‍यांनी बंदिस्त गोठे बनवावेत आणि रात्री घरातून बाहेर पडण्यापूर्वी हातात टॉर्च, काठी ठेवावी तसेच गाण्यांचा आवाज करावा, असे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.

 

Back to top button