बिबट्याच्या हल्ल्यात टोणगा मृत्युमुखी; बेल्हे येथील घटना | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात टोणगा मृत्युमुखी; बेल्हे येथील घटना

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: दबा धरून बसलेल्या बिबट्याने घरासमोर बांधलेल्या तीन वर्षांच्या टोणग्याचा फडशा पाडला. ही घटना गुरुवारी (दि. 6) रात्री 12 वाजेच्या सुमारास इंदिरानगर (बेल्हे) शिवारात घडली. आठ दिवसांत एकाच ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याची दुसरी घटना असल्याने वनविभागाच्या बेल्हे वनपाल कार्यालयाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, बेल्हे (इंदिरानगर) येथील अन्वर दरवेशी यांच्या घरासमोर टोणगा बांधलेला होता. परिसरातील उसाच्या फडात दबा धरलेल्या बिबट्याने तीन वर्ष वयाच्या या टोणग्यावर हल्ला केला.

त्याला जबड्यात पकडून फरफटत ओढत नेत त्याचा फडशा पाडला. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास बिबट्याने टोणगा ठार मारल्यानंतर दरवेशी कुटुंबाने बिबट्याला हुसकाविण्यासाठी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने लगतच्या उसाच्या फडात धूम ठोकली. या घटनेची ग्रामस्थांनी बेल्हे वनपाल कार्यालयाला दिली; मात्र घटनेची माहिती मिळूनही सायंकाळपर्यंत वनविभागाचा कोणताही कर्मचारी अथवा अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान बिबट्याने घोडीवर हल्ला केल्यानंतर तो नरभक्षक बनतो, अशी भावना ग्रामस्थांची असून सात दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार झाली होती. त्याच ठिकाणी गुरुवारी रात्री त्याने टोणगा ठार केल्यामुळे वनविभागाने गेल्या आठ दिवसांत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली नसल्याने वनविभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Back to top button