अवसरी बुद्रुकच्या ग्रा.पं. प्रवेशद्वाराला ठोकले टाळे | पुढारी

अवसरी बुद्रुकच्या ग्रा.पं. प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

मंचर; पुढारी वृत्तसेवा: अवसरी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराला कंटाळून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले. सोमवारी (दि. 3) कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचा आंदोलनाद्वारे निषेध केला. ग्रामपंचायत प्रवेशद्वारासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण, स्वप्नील हिंगे, मनीषा फल्ले, कल्याण हिंगे, गुलाब हिंगे, ज्ञानेश्वर हिंगे, नवनाथ हिंगे, संतोष हिंगे, प्रभाकर हिंगे, चंद्रकांत हिंगे आदी उपस्थीत होते.

शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की सरपंच पवन हिले यांनी मनमानी पद्धतीने सोमवारी (दि. 3) होणारी ग्रामसभा रद्द केली. पावसामुळे अनेक वाड्या-वस्तीवरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत, ते बुजवले नाहीत. घंटागाडीचे नियोजन नाही. त्यामुळे गावात सर्वत्र घाण पसरली आहे. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरील दिवे बदलले नाहीत. गावात होणारे अतिक्रमण यावर कारवाई होत नाही. अनेक मंजूर कामे प्रलंबित आहेत, गटारांची कामे होणे बाकी आहे. ग्रामसभा वेळेवर घेतल्या जाव्यात, अशा विविध मागण्या ठिय्या आंदोलनावेळी करण्यात आल्या.

ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला मी उपस्थित नव्हतो. मासिक सभा उपसरपंच शीतल हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेमध्ये ग्रामसभेची तारीख दि. 3 ऑक्टोबर असल्याचे मला माहिती नव्हते. लवकरच ग्रामसभा लावून नागरिकाच्या अडचणी समजून घेतल्या जातील. केवळ राजकारण म्हणून प्रसिद्धीसाठी स्टंट करू नये. समाजासाठी प्रामाणिकपणे मी काम करत आलो आहे, याची ग्रामस्थांना खात्री आहे.

                                          – पवन हिले, सरपंच, अवसरी बुद्रुक

 

Back to top button