पुणे: शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने तरूणीला मिळाले पैसे; तरूणीची सायबर चोरट्यांनी केली होती फसवणूक | पुढारी

पुणे: शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने तरूणीला मिळाले पैसे; तरूणीची सायबर चोरट्यांनी केली होती फसवणूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात सायबर फ्रॉडच्या तक्रारी वाढत असताना प्रत्येक पोलिस ठाण्यावर त्यांच्या हद्दीतील सायबर तक्रारींची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी अशाच एका सायबर तक्रारीमध्ये तक्रारदार तरूणीला न्याय मिळवून देताना ऑनलाईन शॉपींग करताना तिच्या गेलेल्या 55 हजारांपैकी 45 हजार रूपये परत मिळवून दिले आहे. गोल्डन हावरमध्ये तिने पोलिसांशी साधलेल्या संपर्कामुळे तिला तिचे पैसे परत मिळाले आहेत.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाकडे एका मुलीने ऑनलाईन खरेदी करताना तिचे 55 हजार रूपये गेल्याची तक्रार केली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ऑनलाईन खरेदी केल्यानंतर तीला तिच्या मोबाईलवर एक लिंक पाठविण्यात आली होती. सायबर चोरटयांनी सांगितल्यानुसार, तिने पाठवलेली लिंक क्लिक केली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिच्या मोबाईलचा ताबा सायबर चोरट्याने घेतला. ताबा मिळाल्याच्या काही मिनिटांच्या आतच त्याने युपीआय ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण 55 हजार काढुन घेतले. तिने लागलीच याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांना केल्यानंतर सायबर पथकाने तिच्या हस्तांतरीत झालेल्या पैशाची व बँकांची माहिती मिळवली. त्यानंतर त्या बँकांशी संपर्क साधून त्यांचे अकाऊंट फ्रिज केले. गेलेल्या 55 हजारांपैकी आता त्या तरूणीला 45 हजार रूपये मिळाले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरिविंद माने, सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, अमंलदार गणपत वालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, रूचिका जमदाडे यांनी कारवाई केली.

तरूणी ही नोकरदार असून तिचे नुकतेच लग्न ठरले आहे. त्याच अनुषंगाने तिने ऑनलाइन शॉपींग केली होती. ही शॉपींग करताना तीचे 55 हजार रूपये गेले होते. तिचे 45 हजार रूपये तिला परत मिळवून देण्यात आमच्या सायबर पथकाला यश आले आहे. दिवाळी तसेच इतर सणांच्या तोंडावर ऑनलाईन खरेदी करताना अशी फसवणुकीची शक्यता पाहता कुठल्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका. तसे काही घडल्यास 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.
– अरविंद माने, वरिष्ठ निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे.

Back to top button