खेड-शिवापूर नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी | पुढारी

खेड-शिवापूर नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील उड्डाण पूल पाडण्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 1) रात्री नऊनंतर सदर रस्त्यावर जाण्यास अवजड वाहनांना बंदी घातली होती. परिणामी रात्री साडेदहाच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्यावर या वाहनांना थांबवले होते. टोलनाका ते केळवडे अशा सुमारे आठ ते नऊ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

चांदणी चौकातील पूल शनिवारी रात्री पाडणार असल्याचे संबंधित प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे सातारा बाजूकडून येणारी अवजड वाहने खेड शिवापूर टोलनाक्यावर थांबवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला होता. रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान खेड शिवापूर टोलनाक्यावरिल दहापैकी सात लेनवर अवजड वाहने उभी केली. वाहनांच्या रांगा आठ ते नऊ किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याने सकाळी टोलनाक्यावर वाहने सोडताना टोल कर्मचार्‍यांची धावपळ उडाली.

सकाळी साडेआठनंतर दोन लेनमधील दहा ते वीस गाड्या टप्प्याटप्प्याने सोडल्या. दुपारी साडेबारानंतर पुणे बाजूकडून आलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने टोलनाका ते खेड शिवापूर अशी सुमारे तीन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी दोननंतर वाहतूक सुरळीत झाली. महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक अस्लम खतीब, पोलिस उपनिरीक्षक विनायक कापसे, हवालदार गोडसे, सय्यद, केचे, अर्जुन, गडदे, बयेकर आदींनी वाहतूक सुरळीत केली.

Back to top button