पारगाव : झेंडूच्या फुलांना शंभरीची आशा | पुढारी

पारगाव : झेंडूच्या फुलांना शंभरीची आशा

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: दसर्‍याच्या सणाला अवघे दोन दिवस उरले आहेत. दसर्‍याच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलांची तोडणी करण्यास शेतकरी सज्ज झाले आहेत. सध्या झेंडूच्या फुलांना किलोला 70 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. दसर्‍याला झेंडूच्या फुलांना किलोला शंभरीचा बाजारभाव मिळण्याची आशा फूल उत्पादक शेतकर्‍यांना आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झेंडू उत्पादक शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षे झेंडूच्या फुलांना फटका बसला. कोरोनाचे संकट टळले. परंतु अतिपावसाचा फटका यंदा झेंडू उत्पादकांना बसला. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात या फुलांना अतिपावसाचा फटका बसला. चांगला बाजारभावदेखील मिळाला नाही. शेतकर्‍यांना फुलांचे पैसे मिळाले नाहीत.

गणेशोत्सवातदेखील दररोज पाऊस पडत होता. फुले भिजत होती. व्यापारी फुलांची खरेदी करत नव्हते. शेतकर्‍यांना अक्षरक्षः फुलांच्या बागा सोडून द्यावा लागल्या होत्या. गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसर्‍यापर्यंत फुलांना चांगला बाजारभाव मिळेल अशी खात्री शेतकर्‍यांना होती, परंतु नवरात्रोत्सवातदेखील पावसाने निराशा केली.

पावसाने झेंडूची फुले भिजली. त्यामुळे व्यापार्‍यांनी फुलांच्या खरेदीकडे पाठ फिरवली. गेले दोन दिवसात फुलांना किलोला 60 ते 70 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. दसर्‍याच्या सणाला फुलांना किलोला शंभरीचा बाजारभाव निश्चित मिळेल, अशी आशा फूल उत्पादक शेतकरी प्रकाश वाघ यांनी व्यक्त केली.

Back to top button