बारामती : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका | पुढारी

बारामती : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी ‘बीएच’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी, तसेच उर्वरित क्रमांकासाठी दुचाकी वाहनांबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी या कार्यालयात हवे असणारे आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास सुलभतेने तो मिळावा, यासाठी ही कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. ज्या चारचाकी वाहनमालकांना नव्याने सुरू होणार्‍या दुचाकी मालिकेतील आकर्षक, तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी कार्यालयीन वेळेत अर्ज करावा लागेल.

दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी अर्ज सादर करावा लागेल. त्यासोबत धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी सोमवारी (दि. 3) सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. अर्जदारांना लिलावासाठी जादा रकमेचा डीडी जमा करायचा असल्यास तो 4 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत करता येईल. त्याच दिवशी चार वाजता लिफाफे उघडून जादा रकमेचा डीडी देणार्‍यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल.

चार चाकी खासगी संवर्गातील तिप्पट रकमेच्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुचाकीसाठी पसंती क्रमांक आरक्षित करता येतील. त्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत डीडी जमा करता येईल. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास दि. 7 पर्यंत जादा रकमेचा डीडी देता येईल. त्याच दिवशी जादा रक्कम मोजणार्‍यास तो क्रमांक दिला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही, तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी कळविले आहे.

 

 

 

Back to top button