महंमदवाडीत ऐन सणासुदीत पाणीटंचाई | पुढारी

महंमदवाडीत ऐन सणासुदीत पाणीटंचाई

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा: कृष्णानगर येथील जलवाहिनीचा व्हॉल्व्ह पुन्हा बंद पडला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शनिवारी सकाळी महंमदवाडी परिसरातील नागरिकांना पाणी मिळाले नाही. यामुळे महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
महंमदवाडी, कृष्णानगर येथील व्हॉल्व्ह नजीकच्या काळात एक, दोन नव्हे, तर तब्बल तीनवेळा नादुरुस्त झाला आहे. यामुळे लागोपाठ दोन दिवस परिसरात पाणीपुरवठा झाला नव्हता. त्यानंतर या व्हॉल्व्हची दुरुस्ती केल्यानंतर नागरिकांना तिसर्‍या दिवशी पाणी मिळाले. मात्र, त्यानंतर शनिवारी पुन्हा हा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा झाला नाही. ही समस्या पुन्हा उद्भवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नवरात्रोत्सवात पहाटेपासून घराघरांमध्ये विविध धार्मिक विधी पार पडतात. या सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. मात्र, या काळात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने परिसरात टँकरव्दारे पाणीपुरवठा करायला हवा होता. मात्र, तसे न झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रहिवासी पोपटराव आंबेकर म्हणाले, ‘पाण्याच्या समस्येमुळे आम्ही महापालिका प्रशासनापुढे हात टेकले आहेत. ऐन सणासुदीत लोकांना पाणी नाही, याचे मोठे वाईट वाटते.’

जलवाहिनीला पहिला व्हॉल्व्ह बसविण्यात आला होता. त्याच ठिकाणी शुक्रवारी रात्री दुसरा एअर व्हॉल्व्ह कृष्णानगरपासून पुढे पाणी देण्यासाठी बसविण्यात येत होता. मात्र, रात्रीच तो उडून बाजूला पडला. त्याची दुरुस्ती करून नागरिकांना लवकरात लवकर पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
                                               – सोमनाथ वास्कर, पाणीपुरवठा आधिकारी

Back to top button