वाल्हे-निरादरम्यानचे रेल्वे गेट राहणार 48 तास बंद | पुढारी

वाल्हे-निरादरम्यानचे रेल्वे गेट राहणार 48 तास बंद

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे-मिरज लोहमार्गावर असलेल्या वाल्हे-निरादरम्यानचे थोपटेवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील रेल्वे फाटक क्रमांक 27 किलोमीटर 79/01 रेल्वेगेट सोमवार (दि. 3) सकाळी 7 ते बुधवार (दि. 5) सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे 48 तास वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे. नवरात्र उत्सवकाळातील शेवटचे तीन दिवस व दसरा हा महत्त्वाचा सण आता आहे. या तीन ते चार दिवसांत प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करतात.

या मार्गावरून पुढील या तीन दिवसांत मुंबई, पुणे, नाशिक मोठ्या शहरांसह राज्यभरातून चाकरमानी आपल्या मुळगावी दसरा सण साजरा करण्यासाठी जात असतात. मात्र, जेजुरी ते निरा यादरम्यानचा पालखीमार्ग रेल्वेने बंद ठेवल्याने या प्रवाशांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा निरा येथे येथून पुढील प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल 40 किलोमीटरचा वळसा या मार्गावरील प्रवाशांना पडणार आहे.

यादरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी जेजुरी-मोरगाव-निरा या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Back to top button