पुणे : कौतुकास्पद! विद्यार्थ्यांनी बनविल्या बॅटरीवरील एलईडी दांडिया | पुढारी

पुणे : कौतुकास्पद! विद्यार्थ्यांनी बनविल्या बॅटरीवरील एलईडी दांडिया

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील चौथ्या वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी नवरात्रीचे निमित्त साधत बॅटरीवर चालणार्‍या एलईडी दांडिया बननिल्या आहेत. या दांडियांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या बॅटरीवर चालणार्‍या आहेत, तसेच आकर्षक व टिकाऊ आहेत. या दांडियांची बॅटरी आपण सहज बदलवू शकतो, अशी माहिती वरद सारडा, विराज खापरे व त्यांच्या संघातील विद्यार्थ्यांनी दिली. आयओआयटी महाविद्यालयाचे इनोव्हेशन इन्क्युबेशन आंत्रप्रेन्युअरशिप अ‍ॅण्ड डेव्हेलपमेंट सेल (आयआयडीसी) विद्यार्थ्यांमध्ये मेक इन इंडियाचे महत्त्व वाढवण्यासाठी व आंत्रप्रेन्युअरशिपसाठीचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते.

विद्यार्थ्यांकडे असलेल्या नवनवीन कल्पना प्रॉडक्ट बनून प्रत्यक्ष वापरात आणण्यावर महाविद्यालयाचा भर असतो. आतापर्यंत 100 हून अधिक आंत्रप्रेन्युअर या सेलच्या मार्फत तयार झाले आहेत. सध्या सात स्टार्टअप सुरू आहेत, अशी माहिती आयआयडीसीचे समन्वयक देवेंद्र इटोळे यांनी दिली. सण उत्सवाच्या काळात बाजारात विदेशी वस्तूंचा सुळसुळाट असताना विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करणे आशादायक आहे. संस्थेचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

Back to top button