पुणे : नशेसाठी औषधाची अवैध विक्री; एकास अटक, पावणेदोन लाखांचा साठा जप्त | पुढारी

पुणे : नशेसाठी औषधाची अवैध विक्री; एकास अटक, पावणेदोन लाखांचा साठा जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नशेबरोबरच बॉडी बिल्डिंगसाठी अवैध पद्धतीने ह्दयाच्या औषधाची (‘मेफेंटरमाईन’) विक्री करणार्‍याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने शंकरशेठ रोड परिसरातून सापळा रचून अटक केली. अमृत पंडित चौधरी (वय 30, रा. केशवनगर, मुंढवा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या मेफेंटरमाईन सल्फेट या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी शामल महिन्द्रकर यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी हा एक हजार रुपयांना या इंजेक्शनची विक्री करत होता, असे तपासात समोर आले आहे. मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधीत औषधे (इंजेक्शनचा) नशेसाठी विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच दैनिक ‘पुढारी’ने देखील काही दिवसांपूर्वी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्या वेळी पोलिस हवालदार नामदेव रेणुसे यांना एक व्यक्ती शंकरशेठ रोडवर मेफेंटरमाईन या औषधाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा रचून चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत कोणत्याही प्रकारची औषधे खरेदी करून विक्री करण्याची परवानगी त्याच्याकडे नसल्याचे दिसून आले. तरुणांना नशा आणि बॉडी बिल्डिंगसाठी तो ही औषधे बेकायदा विक्री करत असल्याचे समोर आले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते, कर्मचारी शंकर नेवसे, उज्ज्वल मोकाशी, विजय पवार, साधना ताम्हाणे, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

तरुणांकडून औषधाला मागणी
रुग्णाचे ह्रदयाचे कमी झालेले ठोके वाढण्यासाठी आणि कमी झालेला रक्तदाब वाढण्यासाठी ‘मेफेंटरमाईन’ हे औषध रुग्णाला देण्यात येते. मात्र, हेच औषध आता मुले व तरूणांकडून नशा करण्यासाठी वापरले जात असल्याचे पुन्हा एकदा पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे. काही व्यक्ती या औषधाची राजरोस विक्री करीत आहेत. प्रामुख्याने तरुणवर्गात हे औषध नशेसाठी वापरले जाते आहे. एकदा का या औषधाची सवय लागली की तरुण त्याच्या आहारी जातो.

अवैध औषधविक्रीचे मोठे रॅकेटच शहरात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन’ असे या औषधाचे नाव आहे. ते रुग्णाला इंजेक्शनद्वारे दिले जाते. पण, त्याचा उपयोग 12 ते 30 वयोगटातील मुले व तरुणांकडून नशा करण्यासाठी मोठया प्रमाणात केला जात आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला ताजेतवाने आणि उत्साही वाटते. तसेच, झोपही येत नाही, म्हणून हे औषध मोठया प्रमाणात वापरले जात आहे.

एक ते पाच हजारांपर्यंत किंमत
या औषधाच्या दहा एमएलच्या बाटलीची किंमत 220 रुपयेे आहे. मात्र, मेडिकल स्टोअरसह इतर व्यक्तींकडून पाचशे, हजार, दीड हजार, दोन हजार व प्रसंगी पाच हजार रुपयांनाही याची विक्री केली जात आहे. तरीदेखील नशा करणारा प्रसंगी इतके पैसे देऊन ते विकत घेतो.

जीममध्ये होतोय वापर…
जीममध्ये या औषधाचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. कारण हे औषध उत्तेजित करणारे असल्यामुळे ते घेतल्यानंतर जीममध्ये व्यायाम करण्यासाठी अधिक उत्साह वाटतो व कंटाळा येत नाही. ब-याच जणांना जीममधूनच सवय लागत असल्याचेही समोर आले आहे.

हे आहेत दुष्परिणाम
भीती वाटणे, भास होणे, चिडचिड होणे
प्रमाणापेक्षा जास्त घेतल्यास ह्रदयाची धडधड वाढून मृत्यू होण्याची शक्यता
ह्रदयविकाराचा धक्का किंवा ह्रदय निकामी होण्याची शक्यता
तात्पुरते फ्रेश वाटते पण त्याची सवय लागते
वेगाने गाडी पळविणे, भांडणे करण्याकडे कल

शहरात या औषधाची अवैध पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडे या औषधाचा मोठा साठा सापडला आहे. त्याने ही औषधे कोठून खरेदी केली? त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा पोलिस शोध घेत आहेत.
                                                        – क्रांतिकुमार पाटील,
                                           वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

मेफेंटरमाईन हे उत्तेजक औषध आहे. औषधाच्या सेवनाने ह्रदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो. औषधाचा मेंदूवर परिणाम होत असल्याने आकलनशक्तीही कमी होते. अशी औषधे डॉ्क्टरांच्या चिठ्ठीशिवाय देणे अथवा त्यांचा साठा करणे बेकायदा आहे. बर्‍याचदा ही औषधे मूळ किमतीपेक्षा जास्त दराने विकून तरुणांची फसवणूक केली जाते.
                                                               – डॉ. अविनाश भोंडवे,
                                               माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

Back to top button