राजेगावला शाळकरी मुलीला पळविण्याचा प्रयत्न फसला | पुढारी

राजेगावला शाळकरी मुलीला पळविण्याचा प्रयत्न फसला

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा: लहान मुलांना खाऊचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेले जात असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 28) सायंकाळी असा प्रकार राजेगाव (ता. दौंड) येथील खैरे-बागडे वस्तीवर घडला. दरम्यान, मुलीच्या प्रसंगावधानाने अनुचित प्रकार टळला. शाळा सुटल्यानंतर मुले आणि मुली घरी चालले होते. खैरेवस्तीनजीक काही अंतरावर सहकारी पुढे गेल्याने एक शाळकरी मुलगी एकटीच मागे राहिली. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या जोडप्याने, मी तुझी मावशी असून आम्ही घरी चाललो आहे. तू आमच्याबरोबर चल, असे सांगितले. परंतु, मुलगी त्यांच्याबरोबर गेली नाही.

त्या जोडप्याने खूप प्रयत्न केला, परंतु मुलगी त्यांच्याबरोबर गेली नाही. घरी गेल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या घरी कोणी पाहुणे आलेच नव्हते. त्यामुळे या प्रकाराने मुलीचे पालक घाबरले. त्यांनी घडलेला प्रकार पोलिस पाटील महेश लोंढे यांना सांगितला. नागरिकांनी सतर्क राहावे. मुलांनी अनोळखी माणसांच्या बरोबर बोलू नये. याबाबत शाळा आणि पालकांनी जनजागृती करावी. संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.

राजेगाव येथील घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना दिली आहे. मी स्वतः मुलीच्या घरी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. घडलेला प्रकार खरा असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. मुलांना एकटे सोडून जाऊ नका. मुलांनी अनोळखी माणसाच्या गाडीवर बसू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
                                                                         महेश लोंढे, पोलिस पाटील

Back to top button