बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात | पुढारी

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून होणार सुरुवात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती  राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

1 ते 21 ऑक्टोबर पर्यंत कला, वाणिज्य, शास्त्र शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. तर व्यवसाय अभ्यासक्रम, नियमित विद्यार्थी, पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार, तुरळक विषय घेऊन बसलेले तसेच आयटीआयचे ट्रान्सफर ऑफ क्रेडीटचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांना 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर महाविद्यालयांना लॉगिनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिली जाईल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधीत विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावीत. आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी सरल डाटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे.

या डाटाबेसवरूनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरायची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरल डाटाबेसमध्ये नसल्याने त्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईनच भरायची आहेत. नियमित शुल्काने आवेदनपत्रे भरायच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करायची तारीख नंतर कळविण्यात येईल. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी अधिक माहितीसाठी राज्य मंडळाच्या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button