पुणे : आता संस्थास्तरावरच मिळणार न्याय, महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या तक्रार निवारणासाठी नियमावली जाहीर | पुढारी

पुणे : आता संस्थास्तरावरच मिळणार न्याय, महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या तक्रार निवारणासाठी नियमावली जाहीर

पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईने विनाअनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या तक्रार निवारणासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार संस्थास्तरावरच आता शिक्षक-शिक्षकेतरांना विविध तक्रारींसंदर्भात न्याय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमावलीमध्ये संस्थास्तरावरील तक्रार निवारण समितीची रचना, तक्रारींचे स्वरूप तसेच तक्रार निवारणाबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच तक्रारदार तक्रार निवारण समितीच्या आदेशावर समाधानी नसेल तर तो अपिलीय समितीकडे अपील करू शकतो, असेही नमूद केले आहे. तक्रारदाराने त्याची तक्रार संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडे तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून सादर करावी. संस्थास्तरावरील तक्रारीचे निवारण 15 दिवसांच्या आत करण्यात यावे. तसेच तक्रार निवारण समितीने दिलेला आदेश तक्रारदारास मान्य नसल्यास समितीच्या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 15 दिवसांत अपिलीय समितीकडे अपील करता येईल, असे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे.

संस्थेचा प्राचार्य अध्यक्ष असणार
संस्थास्तरावरील तक्रार निवारण समितीमध्ये संबंधित संस्थेचा प्राचार्य अध्यक्ष असणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संबंधित विभागीय कार्यालयाचे सहायक संचालक आणि मंडळाचे संबंधित विभागीय कार्यालयाचे सहायक सचिव हे दोन सदस्य असतील. तसेच, संबंधित संस्थेतील एक वरिष्ठ विभागप्रमुख किंवा निवड श्रेणी अधिव्याख्याता सदस्य सचिव असणार आहे.

Back to top button