पुणे : सीओईपीची प्रवेशक्षमता 25 टक्क्यांनी वाढणार | पुढारी

पुणे : सीओईपीची प्रवेशक्षमता 25 टक्क्यांनी वाढणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांची (बी-टेक) प्रवेशक्षमता 25 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी इंजिनिअरिंगमधील महत्त्वाच्या विद्याशाखांमध्ये 150 जागा वाढणार आहेत. यंदाच्या 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी वाढीव जागांनुसार सीईटी सेलद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सीओईपीला तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा काही महिन्यांपूर्वी देण्यात आला.

त्यामुळे यंदाची प्रवेश प्रक्रिया कशी राबविण्यात येईल, याबाबत राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जेईईच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचा आधार घेण्यात येणार आहे.

सीओईपीमध्ये स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोट्याद्वारे प्रवेश होतात. सीओईपीमध्ये सध्या बी-टेकसाठी विविध शाखांमध्ये 570 जागा असून, नव्या निर्णयाद्वारे त्यात साधारण 150 जागांची वाढ अपेक्षित आहे. बी-प्लॅनिंगसाठी 60 जागा आहेत. सीओईपी विद्यापीठ होईपर्यंत एकूण प्रवेशक्षमतेच्या 85 टक्के जागा राज्यातील डोमिसाइल विद्यार्थ्यांसाठी राखीव होत्या, तर 15 टक्के जागा ऑल इंडिया कोट्यासाठी राखीव होत्या.

या कोट्यात जेईई परीक्षेतील गुणांद्वारे प्रवेश होतात. राज्यातील विद्यार्थी देखील या कोट्यात जेईईच्या गुणांनुसार सहभागी होऊ शकतात. मात्र, जागा वाढल्याने यंदा 100 टक्के जागा राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे वाढलेल्या जागा या ऑल इंडिया कोट्यासाठी राहणार आहेत, अशी माहिती सीओईपी प्रशासनाकडून देण्यात आली.

डिप्लोमानंतर अनेक विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना थेट द्वितीय वर्षात प्रवेशासाठी सीओईपीला प्रवेश घ्यायचा असतो. त्यानुसार थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियाही सीईटी सेलकडून राबविण्यात येणार आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात एम-टेक, एम-प्लॅनिंग आणि एमबीए अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत कोणतीही प्रवेशवाढ झालेली नाही.

त्यामुळे एम-टेक अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता 486 एवढी असून, एम-प्लॅनिंगसाठी 31 आणि एमबीएसाठी 30 जागा आहेत. एमबीएची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलद्वारे, सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. त्याचप्रमाणे एम-टेक, एम-प्लॅनिंगचे प्रवेश यापूर्वी झालेल्या प्रवेश प्रक्रियेद्वारे होतील. याबाबतची अधिक माहिती सीओईपीच्या वेबसाइटवर आहे.

 

Back to top button