वेल्हे : सिंहगड, राजगड पर्यटकांनी फुलले | पुढारी

वेल्हे : सिंहगड, राजगड पर्यटकांनी फुलले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: पावसाने रविवारी (दि. 25) दिवसभर उघडीप दिल्याने सकाळ पासून सिंहगडावर पर्यटकांनी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. वनविभागाने घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन केल्याने दुपारचा अपवाद वगळता वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. त्यामुळे पर्यटकांनी सुटकेचा श्वास घेतला. राजगड किल्लाही आज पर्यटकांनी फुलून गेला होता. दिवसभरात सिंहगडावर वाहनांने जाणार्‍या पर्यटकांकडून एक लाख चार हजार रुपयांचा टोल वनखात्याने  वसुल केला.

रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून पर्यटकांची वर्दळ सुरू होती. अकरा वाजता गडावरील वाहनतळ फुल झाला. त्यामुळे साडे अकरा वाजता काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर अर्धा पाऊण तासाने पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके यांच्यासह सुरक्षारक्षकांनी वाहतुकीचे नियोजन केले. वाहनतळ तसेच अवसरवाडी व गोळेवाडी मार्गावर टप्प्या टप्याने वाहने सोडण्यात आली.

वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले, दिवसभरात दुचाकी 1258 व चारचाकी 411 वाहने गडावर गेली. याशिवाय अतकरवाडी व पायी मार्गाने मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करत आहेत. तीन महिन्यांनंतर आज राजगड, तोरणा भागात पावसाने विश्रांती घेतली. राजगडावर पर्यटकांनी सुट्टीच्या दिवशी गर्दी केली होती. तरुणाईने गडाचा बालेकिल्ला, पद्मावती माची व परिसर बहरून गेला होता. दिवसभरात दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. राजगडाचे पुरातत्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे, सुरक्षारक्षक आकाश कचरे, दीपक पिलावरे, विशाल पिलावरे आदींंंनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली होती.

 

Back to top button