पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कोंडी; नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी | पुढारी

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कोंडी; नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नवरात्रीनिमित्त घटस्थापनेच्या आदल्या दिवशीच रविवारी (दि. 25) पुणेकर नागरिकांनी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मध्यवस्तीतील प्रसिद्ध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घटस्थापनेसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी पुणेकरांनी मंडई, मार्केट यार्ड, रविवार पेठ, बोहरी आळी यांसह उपनगरातील छोट्या-मोठ्या बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती.

अनेक नागरिक घटस्थापनेकरिता आवश्यक असलेल्या टोपली, माती, फळे, धूप, अगरबत्ती, कापूर, सुगंधी द्रव्य, हार, छोटी मडकी (सुगडी), विड्याची पाने, विविधरंगी रांगोळ्या, नारळ यांसारख्या वस्तू खरेदी करताना दिसत होते. त्यामुळे बाजारपेठा गर्दीने गजबजल्या होत्या. यात विकेंड असल्यामुळे गर्दीत आणखीनच भर पडली.

मंडई परिसरात वाहनचालकांच्या नाकीनऊ
शहराच्या मध्यवस्तीमध्ये मंडई असून, ही बाजारपेठ सणासुदीला नेहमीच गजबजते. रविवारीसुद्धा खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि त्यांच्या वाहनांची येथे प्रचंड गर्दी झाली होती. येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे येथील रस्ते आणि परिसर अरुंद झाला आहे. त्यामुळे या कोंडीत आणखीनच भर पडली. या गर्दीतून रस्ता काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले.

Back to top button